प्रसाद जगताप
पुणे: पीएमपीच्या ताफ्यात आगामी काळात दोन हजार गाड्या येणार आहेत, त्या गाड्या पार्क कुठे करायच्या? असा प्रश्न पीएमपीला पडलेला आहे. बसगाड्या पार्किंग आणि संचलनासाठी तब्बल 120 एकर जागेची आवश्यकता असून, त्यासाठी पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांची पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात जोरदार शोध मोहीम सुरू झाली आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या 2001 गाड्या आहेत, आगामी काळात स्व:मालकीच्या आणि केंद्रशासनाच्या पीएमईड्राईव्ह योजनेमधून दोन हजार नव्या बस दाखल होणार आहेत. यामुळे एकूण चार हजार बस आगामी काळात पीएमपीच्या ताफ्यात असणार आहेत. मात्र, ताफ्यातील अगोदरच्याच बस पार्कींगसाठी जागा अपुरी असताना नवीन बस आल्यावर त्या पार्कींग आणि त्यांच्या संचलनाच्या नियोजनासाठी जागा कोठून आणायची, असा प्रश्न पीएमपी प्रशासनासमोर आहे.
अशी केली जागांची मागणी
पुणे महानगरपालिका हद्दीत - 24 जागांची मागणी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत - 10 जागांची मागणी
पीएमआरडीए हद्दीत - 3 जागांची मागणी
विकास आराखड्यातील आरक्षित जागांचा शोध सुरू
पीएमपी प्रशासनाला नव्या बस पार्कींगसाठी जागांची आवश्यकता आहे. त्याचा शोध पीएमपीकडून सुरू झाला आहे. विकास आराखड्यातील आरक्षित जागांचा शोध प्रशासनाने घेतला असून, त्या पीएमपी प्रशासनाला मिळाव्यात, यासाठीचा प्रस्ताव तयार करून, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए प्रशासनाला देण्यात आला आहे. संबंधित प्रशासनाकडून पीएमपीला जागा देण्याबाबत कसा प्रस्ताव मिळतो, हे पहावे लागणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात आगामी काळात दोन हजार नव्या गाड्या येणार आहेत. या दोन हजार बसगाड्या खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील. त्या गाड्यांसाठी आम्हाला 120 एकर जागा आवश्यक आहे. विकास आराखड्यातील जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी आम्ही पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीएला केली आहे.पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल