प्रसाद जगताप
पुणे : पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना चांगली आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी तब्बल 18 वर्षांपूर्वी बंद पडलेली वायरलेस (वॉकी-टॉकी) यंत्रणा पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रस्त्यात बस बेकडाऊन झाल्यास किंवा अन्य कोणतीही अडचण आल्यास पीएमपीच्या चालक-वाहकाला शहरात कोठेही तातडीने मदत पुरवता येणार आहे. ही यंत्रणा पोलिस स्टाईल कम्युनिकेशन करणारी असणार असून, लवकरच प्रत्येक चालक-वाहकाकडे ‘वॉकी-टॉकी’ पाहायला मिळणार आहे.
पीएमपीला वारंवार येणाऱ्या कम्युनिकेशन गॅपच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी हा निर्णय घेतला आहे. पीएमपीच्या बसमध्ये वॉकी-टॉकी बसवून कंट्रोल रूमशी थेट संपर्क साधणे चालक-वाहकांना आता शक्य होणार आहे.
यामुळे अपघात किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास मदतीसाठी लागणारा वेळ कमी होऊन सेवा अधिक वेगवान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीएमपीसाठी आवश्यक असलेली वायरलेस फिक्वेन्सी गेली 18 वर्षांपूर्वीच मंजूर झालेली आहे. पूर्वी मोबाईल नव्हते, तेव्हा पीएमपी चालक-वाहकांशी प्रशासनाचा थेट वॉकी-टॉकीने संपर्क होत असे. मध्यंतरीच्या काळात मोबाईल, व्हॉट्सॲप, ई-मेल आले. मात्र, तरीही पीएमपीची सेवा पुरवताना अनेक ठिकाणी व्यवस्थित कम्युनिकेशन होत नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांप्रमाणेच प्रवाशांना तत्काळ सेवा पुरवण्यासाठी ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय अध्यक्ष पंकज देवरे यांनी घेतला आहे. पीएमपी आता मोटोरोला कंपनीचे उच्च दर्जाचे वॉकी-टॉकी संच खरेदी करणार आहे.यामुळे पोलिसांप्रमाणेच बसमधील चालक-वाहक तत्काळ संदेश पीएमपी कंट्रोल रूमला पाठवू शकतील. यामुळे शहरातील कोणत्याही भागातून मदत त्वरित उपलब्ध करणे शक्य होणार आहे.
प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर सेवा देणे, हे पीएमपीचे प्रथम उद्दिष्ट आहे. पूर्वी ही वायरलेस यंत्रणा कार्यान्वित होती, परंतु काही कारणास्तव ती बंद पडली होती. आता आम्ही ही फिक्वेन्सी पुन्हा तातडीने ॲक्टिव्ह करत आहोत. बसमधील कोणतीही अडचण कंट्रोल रूमला तत्काळ समजल्यास, मदतीसाठी लागणारा वेळ जवळजवळ शून्यावर येईल. यामुळे फक्त दळणवळण सुरळीत होणार नाही, तर पीएमपीच्या ऑपरेशनल कार्यक्षमतेतही मोठी वाढ होईल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल