पुणे : पीएमपी बसमध्ये प्रवाशांना त्रास होईल अशा पद्धतीने आणि प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता अनेक जण रील व्हिडीओ शूटिंग करीत असल्याचे समोर आले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बस ही सार्वजनिक सेवेसाठी असून, तिचे रूपांतर वैयक्तिक मनोरंजनाच्या प्लॅटफॉर्ममध्ये होऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
सध्या सोशल मीडियासाठी रील बनविण्याचे वेड तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, आता तरुणाई पुण्याची सार्वजनिक वाहतूकव्यवस्था असलेल्या पीएमपीच्या बसमध्येही विनापरवाना व्हिडीओ किंवा रील बनवत आहेत. परंतु, आता ते महागात पडू शकते. कारण, पीएमपी प्रशासनाने अशा प्रकारच्या शूटिंगवर बंदी घातली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
बसच्या आत कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक किंवा सोशल मीडिया शूटिंग करण्यासाठी पीएमपी प्रशासनाची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे. चालत्या बसमध्ये स्टंट करणे किंवा प्रवाशांच्या खासगीपणाचा भंग होईल असे व्हिडीओ काढणे कायद्याने गुन्हा ठरू शकतो. विनापरवाना शूटिंग करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पीएमपी बसप्रवाशांच्या सुविधेसाठी आहेत. येथे विनापरवाना शूटिंग केल्यामुळे इतर प्रवाशांना मनस्ताप होऊ शकतो आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाच्या परवानगीविना कोणीही बसमध्ये रील व्हिडीओ शूट करू नये. काही शुल्क आकारून आणि काही अटी-शर्तींवर शूटिंगसाठी परवानगी देण्यात येईल. तसेच, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना शिस्त पाळावी आणि नियमांचे उल्लंघन टाळावे. बसमध्ये मोबाईल कॅमेरा काढण्यापूर्वी परवानगी आहे का? याचा विचार नक्की करावा.पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल