पुणे: रब्बी हंगाम 2025-26 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याकामी पीक विमा नोंदणीचे पोर्टल सुरू झाले आहे. त्यामुळे योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी संचालक (प्रक्रिया व नियोजन) विनयकुमार आवटे यांनी केले आहे. विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत ही ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर, गहू, हरभरा, कांदा पिकासाठी 15 डिसेंबर, उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग साठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Pune News)
राज्यात 10 नोव्हेंबरअखेर 8 हजार 379 शेतकऱ्यांचे विमा अर्जांची नोंदणी झालेली आहे. त्यातून सुमारे 5 हजार 331 हेक्टरवरील पिकांसाठी विमा उतरविण्यात आला आहे. विम्यापोटी शेतकऱ्यांनी 24 लाख 40 हजार 946 रुपयांइतकी रक्कम विमा कंपनीस दिलेली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारचा प्रत्येकी 2 लाख 34 हजार 392 रुपयांइतका विमा रकमेचा वाटा आहे. तर एकूण विमा रक्कम सुमारे 29 लाख 9 हजार 731 रुपयांइतकी आहे.
विमा योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.
जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक नोंदणी अत्यावश्य आहे. तसेच पुढे ई-पीक पाहणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे पोर्टलवर https://pmfby.gov.in स्वतः शेतकरी यांनी अथवा बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इंन्शुरन्स ॲप व सामूहिक सेवा केंद्रामार्फत (सीएससी) योजनेतील सहभागाची नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी तत्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवानही आवटे यांनी केले आहे.