पुणे; पुढारी वृत्तसेवा : वर्षानुवर्षे मिळकतकराची थकबाकी असलेल्या 1400 मिळकती महापालिकेने सील केल्या असून, या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यातील 200 मिळकतींचा लिलाव होणार असून, ही प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत मिळकतकर हा आहे. महापालिकेला मागील वर्षी सप्टेबर महिन्यापर्यंत सुमारे 2 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या वर्षी महापालिकेला 1 हजार 400 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, महापालिकेच्या अंदाजित उत्पन्नापेक्षा सुमारे 600 कोटी रुपयांनी कमी उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महापालिकेकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.
आर्थिक वर्ष संपल्यानंतरही जे कर भरत नाहीत, अशांना नोटीस पाठवली जाते. सलग काही वर्षे मिळकतकर थकीत राहिलेल्यांवर मालमत्ताजप्तीची कारवाई केली जाते. अशा प्रकारे पालिकेने आतापर्यंत सुमारे 14 हजार मिळकती सील केल्या आहेत. सील केलेल्या मिळकतींचा पालिकेतर्फे लिलाव केला जाणार आहे. सील केलेल्या 1400 मिळकतींपैकी पहिल्या टप्प्यात 200 मिळकतींचा लिलाव केला जाईल. त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून, ऑक्टोबरमध्ये लिलाव प्रक्रिया सुरू होईल, असे विक्रम कुमार म्हणाले.
मिळकतकर थकबाकीपोटी पालिकेने आतापर्यंत 1400 मिळकती सील केल्या असल्या, तरी आणखी 30 हजार व्यावसायिक मिळकतींचा मिळकतकर थकीत आहे. या मिळकती सील करण्याची प्रक्रियाही तातडीने सुरू केली जाईल. तसेच, 23 गावांमधील मिळकतकराची बिले ऑक्टोबरअखेरपर्यंत काढली जातील, असेही त्यांनी सांगितले.
मिळकतकर विभागातर्फे सील केलेल्या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. याशिवाय करवसुलीचे उद्दिष्टही साध्य करायचे आहे. त्यामुळे मिळकतकर विभागाला अतिरिक्त कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय मिळकतकर थकबाकीच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांना गती मिळावी, यासाठी कंत्राटी वकिलांच्या संख्येत वाढ केली जाईल.
– विक्रम कुमार,
आयुक्त, महापालिका.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.