पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक सुरक्षित राहावी, यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी दिलेले वॉर्डन गायबच असल्याचा अनुभव शुक्रवारी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना आला. अधिकार्यांच्या पाहणीवेळी 25 पैकी पाचच वॉर्डन दिसल्याने अतिरिक्त आयुक्तांनी वाहतूक पोलिसांना उर्वरित वॉर्डन कुठे आहेत? असा प्रश्न केला. त्यानंतर मात्र उत्तर देताना वाहतूक पोलिसांची भंबेरी उडाल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहे. ज्या ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत, ज्या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते. अशा ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीला वॉर्डन दिले आहेत. या वॉर्डनचे वेतन महापालिका देते, तर त्यांच्याकडून काम करून घेण्याची व त्यांची ठिकाणे ठरवून देण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे देण्यात आली आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीला दोन (सिफ्ट) पाळ्यांसाठी प्रत्येकी 25 असे 50 वॉर्डन दिले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि पथ विभागाच्या अधिकार्यांनी शुक्रवारी भूसंपादन व वाहतूक कोंडीच्या प्रश्नासाठी रस्त्याची पाहणी केली. यावेळी वाहतूक पोलिस आणि केवळ 5 वॉर्डन उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी एका पाळीत 25 वॉर्डन असताना केवळ पाचच वॉर्डन कसे उपस्थित आहेत. उर्वरीत वॉर्डन कुठे गेले असे प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी उपस्थित वाहतूक पोलिसांचा गोंधळ उडाला. त्यांनी वॉर्डन कामावर असल्याचे सांगितले. मात्र, ते कुठे गेले आहेत, हे सांगितले नाही. त्यामुळे महापालिकेचे वॉर्डन दिलेले काम सोडून नेमके कोणती कामे करतात, असा सवाल उपस्थित होत आहे.
हेही वाचा