मुंबई, पुढारी वृत्तसेवा : तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस, असे पतीने पत्नीला टोमणे मारणे म्हणजे छळ नव्हे, ती काही असभ्य शिवीगाळ ठरत नाही, असे स्पष्ट करीत एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला.
या प्रकरणातील पतीने पत्नीपासून घटस्फोट मागण्यासाठी याचिका दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान, पत्नीने आरोप केला की, पती रात्री उशिरा येऊन शिवीगाळ करतो, शारीरिक व मानसिक छळ करतो. त्यावर न्यायालयाने काही स्पष्ट उदाहरणे सांगा, असे म्हटल्यावर त्या महिलेने पती आपल्याला तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस असे म्हणतो, असे सांगितले. त्यावर न्या. नितीन सांबरे व न्या. शर्मिला देशमुख यांनी वरील भाष्य केले.
या प्रकरणात पतीने आरोप केला की, 2007 मध्ये लग्न होण्याआधीच पत्नीला आपण एकत्र कुटुंबात राहावे लागेल, असे सांगितले होते; पण लग्नानंतर तिने वेगळे राहण्याचा हट्ट धरला. ती आई-वडिलांची काळजीही घेत नसे. त्यावर पत्नीने युक्तिवाद केला की, पती आणि त्याचे आई-वडील हे स्वार्थी व त्रासदायक लोक असून, त्यांनी आपल्याला खूप त्रास दिला.