Devendra Fadanvis Pudhari
पुणे

Pune TP Schemes: समाविष्ट गावांमधील टीपी योजना महापालिकाच राबवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) असलेली २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने जून २०२१ ला घेतला.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: समाविष्ट २३ गावांमधील मंजूर नगररचना (टीपी स्किम) राबविण्याचे अधिकार पुणे महापालिकेला देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील रखडलेल्या तिन्ही टीपी स्किमला गती मिळणार आहे.

वडाचीवाडी नगररचना योजना क्र. २, औताडे-हांडेवाडी नगररचना योजना क्र. ३, होळकरवाडी नगररचना क्र. ४ आणि होळकरवाडी नगररचना योजना क्र. ५ अशा या चार नगररचना योजनांचा समावेश आहे.

पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) असलेली २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने जून २०२१ ला घेतला. मात्र, या गावांचा विकास आराखडा आणि त्यामध्ये असलेल्या नगररचना योजना पीएमआरडीएकडे असल्याने त्याची कार्यवाही पीएमआरडीएकडून सुरू होती.

दरम्यान, पीएमआरडीएने केलेला प्रारुप विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने गतवर्षी घेतला. तसेच, या गावांकडील बांधकाम परवानगीचे अधिकारही महापालिकेला देण्यात आलेत. मात्र, पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू झालेल्या नगररचना योजना कोण राबवणार यावर निर्णय प्रलंबित होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत आठवड्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक घेतली. या बैठकीत पीएमआरडीएकडून महापालिकेकडे वर्ग झालेल्या २३ गावांमधील अंतर्भूत असणाऱ्या मंजूर प्राथमिक नगररचना योजनांबाबतची पुढील कार्यवाही पुणे महापालिकेने करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार आता नगरविकास विभागाकडून यासंबंधीचे आदेश लवकरच काढण्यात येतील, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

पीएमआरडीएला लागू होणार यूडीसीपीआर नियमावली

पीएमआरडीएसाठी एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) लागू करण्याचा ठराव प्राधिकरणाच्या बैठकीत यापूर्वी घेण्यात आला. यासंबंधीच्या नगर विकास विभागाकडे असलेल्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT