

पुणे: खडकवासला धरणसाखळीतील घटता जलसाठा, यंदाच्या मान्सूनबाबत व्यक्त केलेली अनिश्चितता आणि पुढील काही महिने शहराला पुरेसे पाणी उपलब्ध राहावे, या उद्देशाने महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी सोमवारपासून (दि १५) संपूर्ण पुण्यात सम-विषम तारखेनुसार एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक महापालिकेने जाहीर केले आहे. महत्त्वाचे म्हणजे कार वॉश, स्विमिंग पूल, उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर आणि बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्यावर निर्बंध घातले आहेत.
महापौर मंजूषा नागपुरे यांनी गुरुवारी (दि.11) आयोजित पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. यावेळी सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर उपस्थित होत्या.
महापौर नागपुरे म्हणाल्या, खडकवासला धरणसाखळीत सध्या केवळ ५.०३ टीएमसी पाणी शिल्लक असून, त्यापैकी सुमारे तीन टीएमसी पाणी शहरासाठी उपलब्ध आहे. भारतीय हवामान विभागाच्या सुधारित दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीवापरावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शहरासाठी दररोज सुमारे १६०० एमएलडी पाणी उचलले जात असून, कपातीनंतर हा पुरवठा ११०० एमएलडीपर्यंत मर्यादित केला जाणार आहे. फुरसुंगी, मांजरी, वाघोली, नांदोशी, नर्हे, आंबेगाव आणि केशवनगरच्या काही भागांत यापूर्वीप्रमाणे दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
भामा-आसखेड क्षेत्राला तात्पुरती सूट
महापालिकेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शहरातील बहुतांश भागात सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, भामा-आसखेड जलयोजनेतून पाणीपुरवठा होणाऱ्या उत्तर-पूर्व भागाला सध्या तांत्रिक कारणांमुळे या कपातीच्या नियोजनातून वगळण्यात आले आहे. त्या भागासाठी स्वतंत्र नियोजन नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
टँकरद्वारे पर्यायी व्यवस्था
ज्या भागांमध्ये नियोजित दिवशी पाणीपुरवठा होणार नाही, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. नागरिकांना पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवू नये, यासाठी पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
भाग एक : आपटे रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, पुलाची वाडी, शिवाजीनगर गावठाण, डेक्कन जिमखाना परिसर, मनपा भवन, अमर सोसायटी, कांचन गल्ली, भोंडे कॉलनी, खिलारेवाडी, भालेकर चाळ, रजपूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण. वेळ : पहाटे ५.०० ते ११.००
भाग २ : मॉडेल कॉलनी, हनुमाननगर, वडारवाडी, शिवाजीनगर, रेव्हेन्यू कॉलनी. वेळ : दुपारी ०३.०० ते रात्री ०८.००
भाग ३ : जनवाडी, जनता वसाहत, वैदूवाडी, गोखलेनगर, श्रमिकनगर, आशानगर. वेळ : रात्री ०८.०० ते ०१.३०
भाग ४ : बोपोडी. वेळ : सकाळी ०४.०० ते ०९.००
भाग ५ : चिखलवाडी. वेळ : रात्री ११.०० ते १.००
भाग ६ . एनसीएल, अभिमानश्री सोसायटी, चव्हाणनगर. वेळ : सकाळी ०८.०० ते ०३,००
भाग ७ : बाणेर रोड उजवी बाजू, माउली पेट्रोल पंपापर्यंतचा सर्व भाग. वेळ : दुपारी ०१.०० ते ०५.३०
भाग ८ : औंध गाव, प्रीझम सोसायटी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत. वेळ : दुपारी ०३.०० ते १०.००
भाग ९ : भोसलेनगर, अशोकनगर, रेंजहिल, खैरेवाडी. वेळ : दुपारी ०१.०० ते ५.००
भाग १० : संपूर्ण बालेवाडी गावठाण, बालेवाडी. वेळ : दुपारी ०२.०० ते ०८.३०
भाग ११ : मोहननगर. वेळ : पहाटे ०५.३० ते १२.३०
भाग १२ : धनकुडेवस्ती, कपिल मल्हार परिसर, बाणेर गावठाण. वेळ : सकाळी ०४.३० ते ०८.३०
भाग १३ : वीरभद्रनगर, गणराज चौक, बाणेर स्मशानभूमी रोड, पारखी मळा, ज्युपिटर हॉस्पिटल, चाकणकर मळा. वेळ : संध्या. ०५.३० ते ०९.३०
भाग १४ : सुतारवाडी गावठाण, पाषाण पार्ट. वेळ : पहाटे ०४.३० ते ०७.३०
भाग १५ : सूस रोड. सकाळी ११.३० ते ०१.३०
भाग १६ : पंचवटी. वेळ दुपारी १२.३० ते ०६.००
भाग १७ : म्हाळुंगे गाव. सकाळी ०७.३० ते ०९.३०
भाग १८ : सूस गाव. वेळ : सम व विषम तारखेला टँकरद्वारे पाणीपुरवठा
भाग १९ : खडकी छावणी भाग, मुळा रोड. वेळ : सकाळी ०६.०० ते ११.३०
भाग २० : वारजे माळवाडी, कर्वेनगर पार्ट (ममता स्वीट्स ते विठ्ठल मंदिर रस्त्याची उजवी बाजू ते हायवे पर्यंतचा संपूर्ण भाग) रामनगर, शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे, कोंढवे, कोथरूडमधील लक्ष्मीनगर धावडे, फक्त लक्ष्मीनगर. वेळ : पाणी पूर्वीच्या दैनंदिन वेळेनुसार तथापि एक दिवसाआड येईल.