

पुणे: प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याच्या प्रक्रियेला आणखी वेग देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या मागणीनुसार जमीन अधिग्रहणास सहमती देण्याची तसेच मोबदला स्वीकारण्याची मुदत आता ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी दिली.
पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या १ हजार २१६ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ८५१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. यामुळे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठी प्रगती झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आतापर्यंत सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी करारनामे जमा केले असून अनेकांनी मोबदला स्वीकारण्याची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, जमीन अधिग्रहणासाठी आवश्यक निधीपैकी आतापर्यंत सुमारे ९५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय पुढील आठवड्यात आणखी २ हजार कोटी रुपये उपलब्ध होणार असल्याने उर्वरित भूसंपादन आणि मोबदला वितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल.
दरम्यान, काही शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मूल्यांकनासंदर्भातील तांत्रिक बाबी, न्यायालयीन दावे, महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे, नाव दुरुस्ती, वारस नोंदी, हक्कसोडपत्र तसेच इतर महसुली प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. या कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना करारनामे सादर करण्यास विलंब होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधींनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. संबंधित सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त कालावधीत प्रलंबित कागदपत्रांची पूर्तता, महसुली प्रक्रिया आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
मुदतवाढीमुळे उर्वरित जमीन अधिग्रहण प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि राज्यातील सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या पुरंदर विमानतळाच्या कामाला अपेक्षित गती मिळेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.