पुणे: धायरी परिसरात समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत झालेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधित ठेकेदारावर महापालिकेने 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करीत निकृष्ट दर्जाचे काम उघडकीस आणले आणि तातडीने दंडात्मक कारवाईचे आदेश दिले.
समान पाणीपुरवठा योजनेची कामे अंतिम टप्प्यात असताना शहरातील विविध भागांमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामांनंतर रस्ते पूर्ववत करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. धायरीतील उंबऱ्या गणपती परिसरात दोन महिन्यांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली होती. त्यानंतर खोदलेला रस्ता दीर्घकाळ दुरुस्त न करता तसाच ठेवण्यात आला होता.
दरम्यान, मंगळवारी (दि. 26 मे) रात्री संबंधित ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकून रस्ता पूर्ववत करण्याचे काम करण्यात आले. मात्र, काँक्रीट टाकल्यानंतर ते व्यवस्थित सुकावे आणि त्यावर वाहनांची ये-जा होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी, काही तासांतच नव्याने केलेल्या काँक्रीटचा थर उखडण्यास सुरुवात झाली.
या प्रकाराची दखल घेत आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी शनिवारी घटनास्थळी भेट दिली. पाहणीदरम्यान संबंधित ठेकेदार कंपनीने काँक्रीटवर पोती टाकून काम झाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, ती पोती हटविल्यानंतर कामाचा निकृष्ट दर्जा स्पष्टपणे समोर आला. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी स्वतः काँक्रीटची स्थिती तपासून कामात गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आणले.
त्यानंतर आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित ठेकेदारावर 10 लाख रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले. याशिवाय, निकृष्ट दर्जाचे झालेले रस्त्याचे काम ठेकेदाराकडून पुन्हा करून घेण्यात येणार असून, गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत करण्यात आलेले रस्तादुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे आढळले आहे. संबंधित ठेकेदाराकडून हे काम पुन्हा करून घेतले जाईल तसेच त्याच्यावर 10 लाख रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाची कामे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत.नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका