Pune Municipal officer reporting time
पुणे: महापालिका आयुक्तांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी अधिकार्यांच्या आणि कर्मचार्यांच्या कामकाजाच्या वेळेत मोठे बदल केले आहेत. यापुढे वरिष्ठ अधिकारी सकाळी नऊ वाजता कार्यालयात हजर राहणार आहेत.
तर कर्मचार्यांपेक्षा सुमारे पाऊण तास आधीच त्यांच्या कामाची वेळ संपणार आहे. कर्मचार्यांच्या जेवणाच्या वेळेतही बदल करीत केवळ अर्ध्या तासाचा लंचब्रेक मिळणार आहे. तसेच, गैरहजर राहणार्या किंवा उशिरा येणार्या ‘लेटलतिफांवर’ कारवाईचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. (Latest Pune News)
पूर्वी अभियंता व वरिष्ठ अधिकार्यांच्या कामाची वेळ सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.30 अशी होती. आता ही वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5.45 अशी केली आहे. लंचब्रेकची वेळ पूर्वी दुपारी 2 ते 2.30 अशी होती. ही वेळ बदलून आता 1 ते 1.30 अशी बदलली आहे.
हीच वेळ क्षेत्रीय अधिकारी आणि विभागीय निरीक्षकांसाठी देखील लागू केली आहे. प्रशासकीय कर्मचार्यांसाठी कामाची नवी वेळ सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 अशी निश्चित केली आहे. त्यांचा लंचब्रेक 2 ते 2.30 यादरम्यान राहणार आहे. तर, चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या कामाची वेळ सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.30 केली आहे.
नेमून दिलेल्या वेळत कार्यालयात येणे बंधनकारक
सर्व कर्मचार्यांना नेमून दिलेल्या वेळेतच कार्यालयात हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. लंचब्रेकनंतर कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणेही अनिवार्य आहे. बाहेरील दौर्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचार्यांनी कार्यालय सोडण्याची, स्थळभेटीची वेळ व स्थळाची नोंद करणे बंधनकारक असून, वरिष्ठ अधिकार्यांनी या नोंदी तपासाव्यात, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
खातेप्रमुखांना पाठवावा लागणार अहवाल
सर्व खातेप्रमुखांनी दिवसअखेर संध्याकाळी आयुक्त कार्यालयात दैनंदिन उपस्थितीचा अहवाल पाठवायचा आहे. यामध्ये स्थळभेटींच्याही संक्षिप्त नोंदी असणे आवश्यक आहे. उशिरा येणार्यांवर वेळेवर कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.