पुणे: गेल्या काही दिवसांपासून शहरात पडत असलेल्या पावसामुळे महापालिकेच्या रस्त्याच्या कामाचा दर्जाची पोलखोल झाली आहे. पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाने उघडीप दिल्यानंतरही खड्डे दुरुस्तीची कामे संथ गतीने सुरू आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
दरम्यान, 1 एप्रिल पासून 7 हजार 222 खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेच्या पथविभागाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात शरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून यातून मार्ग काढतांना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. (Latest Pune News)
शहरात महापालिकेच्या वतीने दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन रस्त्यांची कामे केली जातात. मात्र रस्त्यांची कामे करताना कामाचा दर्जा राखला जात नसल्याच्या तक्रारी नागरिक करत असतात.
दरम्यान, एक एप्रिलपासून महापालिकेने सात हजार 222 खड्डे बुजविले आहेत. तर 854 चेंबर्सची दुरुस्ती केली आहे. पाणी साठणार्या 257 जागी उपाय योजना केल्या आहेत. तर 2 जुलैपासून समाविष्ट गावात 875 चौरस मीटर रस्ते दुरुस्ती केली आहे. शहरात विविध भागातील 34068 चौरस मीटर रस्त्यांचे डांबरीकरण केले असून या साठी 15 हजार 882 मेट्रिक टन वापरला असल्याची माहिती, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
शहरातील रस्ते तयार करताना शास्त्रीय पद्धतीने रस्ते तयार केले जातात. यासाठी रस्ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्या मार्गदर्शक तत्वांनुसारच काम केले जाते. महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी पथके तयार केली असून पाऊस थांबल्यानंतर त्वरित खड्डे दुरुस्ती केली जात असल्याचे पावसकर यांनी सांगितले.