पुणे

PMC budget : वाहतूक कोंडी अन् सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नाला प्राधान्य

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असल्याने महापालिकेच्या पुढील वर्षाच्या
अंदाजपत्रकातही वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणांना प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार नव्याने 8 उड्डाणपूल उभारण्याबरोबरच पर्यायी रस्त्यासाठी नवीन मिसिंग लिंक डेव्हलपमेंट प्रकल्प, पीएमपीसाठी नव्याने पाचशे बसेसची खरेदी अशा महत्त्वाच्या योजनांचा समावेश आयुक्त विक्रम कुमार यांनी अंदाजपत्रकात केला आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात पथ विभागातील भांंडवली कामांसाठी 1 हजार 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबत माहिती देताना आयुक्त म्हणाले, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व नवीन पर्यायी मार्ग निर्माण करण्यासाठी मिसिंग लिंक डेव्हलपमेंटचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

अस्तित्वातील रस्त्यांना जोडणारी मिसिंग लिंक विकसित करून एक मध्यवर्ती वर्तुळाकार मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय गणेश खिंड रस्त्याचे रुंदीकरण, बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रस्ता व बालेवाडी येथील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. नगर रस्त्यावर गुंजन चौकातून वाडिया मिळकतीपर्यंतचा नवीन पर्यायी रस्ता सुरू करण्यात येत आहे. तसेच कात्रज-कोंढवा रस्त्याचे कामही वर्षभरात पूर्ण होईल असेही आयुक्तांनी सांगितले. याशिवाय खासगी भागिदारी तत्त्वावर 36 किमी लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून, नदीकाठ सुधारणा योजनेतही बंंडगार्डन ते मुंढवा रस्ता विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

उड्डाण व ग्रेड सेपरेटरच्या कामांवर भर

या अंदाजपत्रकात नव्या काही उड्डाणपुलांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात विश्रांतवाडी चौक, घोरपडी गेट क्र.586, शास्त्रीनगर चौक, खराडी बायपास चौक, गणेश रस्त्यावर चार ठिकाणी तसेच हडपसर ससाणेनगर, रेल्वे गेट क्र. 7, खडकी रेंजहिल्स येथील रेल्वे अंडरपास या प्रस्ताव उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरबरोबरच येरवडा येथील बिंदुमाधव बाळासाहेब ठाकरे चौक आणि आंबेडकर चौक या नव्याने प्रस्तावित कामांचा समावेश आहे.

पीएमपीसाठी 482 कोटींची तरतूद

पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी या अंदाजपत्रकात 482 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने पुढील वर्षभरात नव्याने पाचशे बसेसच्या खरेदीचे नियोजन आहे. सीएनजीवर चालणार्‍या चारशे बसेस, तर शंभर ई-बसेसचा समावेश आहे.
स्वारगेट-कात्रज मेट्रोचे काम सुरू होणार
केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी असलेल्या स्वारगेट – कात्रज या मेट्रो मार्गाचे काम पुढील वर्षात सुरू होईल. तसेच स्वारगेट ते हडपसर मार्गाचा आराखडा मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

अंदाजपत्रकाची ठळक वैशिष्ट्ये

  • पीएमपीएमएलच्या ताफ्यात आणखी पाचशे बसेस येणार आहेत. यामध्ये चारशे सीएनजी बसेस आणि शंभर इलेक्ट्रिक बसेस घेतल्या जाणार आहेत. पीएमपीएमएलकरिता 482 कोटी 52 लाख रुपयांची तरतूद केली आहे.
  • आरोग्य विभागाकरिता 516 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नवीन कॅथ लॅब आणि कॅन्सर चाचणी केंद्राचा प्रस्ताव आहे. जेनेरिक औषधांची 19 दुकाने उघडण्यात येणार आहेत.
  • प्राथमिक शिक्षणाकरिता 751 कोटी रुपये आणि माध्यमिक शिक्षण विभागाकरिता 124 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद केली. यावर्षी 30 अभिनव शाळा निर्माण केल्या जाणार आहेत.
  • महापालिका यावर्षी 600 एकरामध्ये टीपी स्कीम राबवणार असून, यासाठी सरकारकडून लोकल एरिया प्लॅन
    योजनेत 400 कोटी अनुदान मिळणार आहे.
  • केंद्र शासनाच्या अमृत योजनेसाठी 1200 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT