PMC : 11,601 कोटींचे विक्रमी अंदाजपत्रक | पुढारी

PMC : 11,601 कोटींचे विक्रमी अंदाजपत्रक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे 2024-25 या पुढील आर्थिक वर्षाचे 11 हजार 601 कोटींचे विक्रमी अंदाजपत्रक आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी गुरुवारी (दि. 7) सादर केले. करवाढ नसलेल्या या अंदाजपत्रकाने पहिल्यांदाच 10 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. या अंदाजपत्रकात चालू असलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर भर देतानाच वाहतूक कोंडी, आरोग्य योजना आदींना प्राधान्य देण्यात आले. महापालिकेतील प्रशासक राजवटीतील दुसरे अंदाजपत्रक आयुक्त विक्रम कुमार यांनी मांडले. मिळकतकरासह पाणीपट्टीत वाढ नसलेले हे अंदाजपत्रक आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाचे 9 हजार 515 कोटींचे अंदाजपत्रक मांडले होते. त्यात आता 2 हजार 16 कोटींची वाढ करण्यात आली आहे.

महापालिकेत समाविष्ट गावांसाठी 550 कोटींच्या निधीची तरतूद, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नव्याने आठ उड्डाणपूल, पीएमपीएमएलसाठी पाचशे बसेसची खरेदी, 15 मॉडेल शाळा, कॅन्सर तपासणी सेंटर, नव्याने कॅथलॅब, जेनरिक मेडिकलचे 19 स्टोअर, कचर्‍यापासून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती, बाणेरमध्ये भाडेतत्त्वावर घरांची योजना, नव्याने आठ अग्निशमन केंद्रांची उभारणी, हॉटमिक्स प्लॅन्ट अशा काही महत्त्वाच्या नवीन प्रकल्पांचा या अंदाजपत्रकात समावेश आहे.

अंदाजपत्रकातील जमा-खर्चाचा ताळमेळ घालताना आयुक्तांनी अपेक्षित उत्पन्नांमध्ये मिळकतकरातून सर्वाधिक 2 हजार 549 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. त्यापाठोपाठ बांधकाम विकास शुल्कातून 2 हजार 492 कोटी, शासकीय अनुदान 1 हजार 762 कोटी, स्थानिक संस्थाकरातून 495 कोटी, पाणीपट्टीतून 495 कोटी, कर्जरोख्यातून 450 कोटी, प्रधानमंत्री आवास योजनेतून 20 कोटी आणि इतर जमा 833 कोटी अशा उत्पन्नाच्या बाबींचा समावेश आहे. तर, खर्चांमध्ये भांडवली व विकासकामांसाठी 5 हजार 93 कोटी रुपये लागणार असून, उर्वरित जवळपास साडेसहा हजार कोटी महसुली खर्च होणार आहे. त्यात सर्वाधिक 3 हजार 556 कोटींचा खर्च कर्मचार्‍यांच्या वेतन व भत्त्यांवर, तर देखभाल दुरुस्तीवर 1 हजार 861 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button