पुणे : भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत महाराष्ट्र राज्याला एकूण 5 पीएम ई-विद्या वाहिन्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने ’पीएम-ई-विद्या’ शैक्षणिक वाहिन्यांचे महाराष्ट्रात प्रक्षेपण सुरू झाले आहे. भारत सरकारच्या ’वन क्लास वन टीव्ही चॅनेल’ या अभिनव संकल्पनेनुसार देशभरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल 200 शैक्षणिक टीव्ही वाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. (Pune Latest News)
पीएम ई-विद्या वाहिन्यांवरून प्रसारित होणारे शैक्षणिक कार्यक्रम 24 तासांत तीनवेळा पुनर्प्रक्षेपित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सोयीच्या वेळेस पाहणे शक्य होते. या उपक्रमासाठी राज्यस्तरावर तसेच वाहिनीनिहाय शैक्षणिक आणि तांत्रिक समन्वय रचना उभारण्यात आली आहे. समन्वयक मंडळ प्रक्षेपणाची गुणवत्ता सुनिश्चित करणे, वेळापत्रक अद्ययावत ठेवणे आणि कार्यक्रमांची शाळा व पालकांपर्यंत प्रभावी पोहोच घडवून आणणे, या जबाबदार्या पार पाडत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याकडून सर्व शिक्षक, अधिकारी तसेच पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, या सर्व शैक्षणिक वाहिन्या यूट्यूबवर सबस्क्राइब कराव्यात. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळेल. या प्रक्षेपणाचे मासिक वेळापत्रक आणि वाहिन्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी यूट्यूब लिंक परिषदेच्या संकेतस्थळावर (www. maa. ac. in) पीएम-ई-विद्या वाहिन्या या टॅबअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पीएम-ई-विद्या वाहिन्यांचा उपयोग करण्यासाठी http:/// www. maa. ac. in या संकेतस्थळावरील लिंकचा देखील उपयोग करता येणार असल्याचे रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.
या वाहिन्यांवर दर्जेदार शैक्षणिक आशयाचे प्रक्षेपण केले जात आहे. या सर्व वाहिन्या डीडी-फ्री डिशव्यतिरिक्त यूट्यूबवर थेट लाइव्ह उपलब्ध असून, प्रत्येक वाहिनीवर दररोज सहा तासांचे शैक्षणिक प्रक्षेपण केले जात आहे.
पहिली व सहावी वर्ग - एससीईआरटीएम सी 113
दुसरी व सातवी वर्ग - एससीईआरटीएम सी 114
तिसरी व आठवी वर्ग - एससीईआरटीएम सी 115
चौथी व नववी वर्ग - एससीईआरटीएम सी 116
पाचवी व दहावीच्या वर्ग - पीएम-ई-विद्या 117