PM Crop Insurance pudhari photo
पुणे

PM Crop Insurance: वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार

2026 च्या खरीपपासून नव्या तरतुदी लागू; जंगलालगतच्या शेतकऱ्यांना दिलासा, दावे 72 तासांत ॲपवर अपलोड करणे अनिवार्य

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. 2026 च्या खरीप हंगामापासून वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई पंतप्रधान पीक विमा योजनेतून देण्यात येणार आहे. आतापर्यंत वन्यप्राण्यांनी केलेले पिकांचे नुकसान या योजनेत समाविष्ट नव्हते; मात्र, नव्या बदलामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांच्या हानीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

देशभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. याची भरपाई पंतप्रधान पीक विमा योजनेतून मिळत नव्हती. या योजनेत वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटना करीत होत्या. या मागणीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेत वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान योजनेच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचे फोटो 72 तासांत पीक विमा योजनेच्या ॲपवर जिओ-टॅगसह अपलोड करणे बंधनकारक आहे.

पूर आणि अतिवृष्टीमुळे भातपिकाचे नुकसान झाल्यास त्याचीही भरपाई पीक विमा योजनेअंतर्गत दिली जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे. हवामानातील तीव बदलांमुळे अनेक भागांत भात लागवडीचे नुकसान होत असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेत निकाली काढले जातील, असे म्हटले आहे. उपग््राह चित्रण, ड्रोन सर्वेक्षण आणि डिजिटल पडताळणीचा वापर करून दावे मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सरकारने स्पष्ट केलेे. या निर्णयांमुळे नैसर्गिक आपत्ती तसेच वन्यजीवांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून अधिक सुरक्षा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी केंद्रीय कृषी विभागाने गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला होता. समितीच्या शिफारशींना मान्यता देत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सुधारित पीक विमा योजना 2026 च्या खरीप हंगामापासून लागू करण्यास मंजुरी दिली आहे. सुधारित योजनेमुळे पीक नुकसानीचे अधिक अचूक मूल्यांकन, जलदगतीने दाव्याचे निराकरण आणि शेतकऱ्यांना अधिक व्यापक संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना हत्ती, रानगवा, नीलगाय, हरीण आणि माकड, रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान सहन करावे लागत असल्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या सुधारित आराखड्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील पीक नुकसान स्थानिक जोखीम या श्रेणीत समाविष्ट करून पाचवे ॲड.- ऑन कव्हर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या नव्या तरतुदीनंतर शेतकऱ्यांना वन्य जीवांमुळे झालेल्या हानीची भरपाई पहिल्यांदाच अधिकृतपणे पीक विम्यातून मिळणार आहे. सरकारचा हा निर्णय जंगलालगतच्या आणि डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT