

खडकवासला : शिरुर, जुन्नरप्रमाणे राजगड तालुक्यात आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील पानशेत खोऱ्यासह बिबट्यांची संख्या वाढली आहे. या परिसरात पन्नासहून अधिक बिबट्यांची संख्या झाल्याने नागरिकांसह वन विभागाची चिंता वाढली आहे. येथे मनुष्यहानी होत नसली तरी पाळीव प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या पाळीव जनावरांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे तर दोन वर्षात बिबट्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. जनावरांचे गोठे, कंपन्या, फार्महाऊससह थेट लोकवस्त्यांत बिबट्या शिरुन कुत्री, वासरे, शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल अशा जनावरांचा फडशा पाडत आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांत सर्वत्र बिबट्यांची दहशत वाढली आहे. एकीकडे या भागात बिबट्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची राजगड तालुका वन विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे आवश्यक यंत्रसामग्री, साधने नाहीत असे गंभीर चित्र पुढे आले आहे.
राजगड तालुका वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे म्हणाले, तालुक्यात पन्नासहून अधिक बिबटे असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. बिबट्यांची नेमकी संख्या मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे ड्रोन कॅमेरे व इतर साधने उपलब्ध नाहीत. गेल्या सहा महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यात तालुक्यात 57 गायी, वासरे, शेळ्या, मेंढ्या अशी जनावरे मृत्युमुखी पडली. तसेच मुत्युमुखी पडलेल्या जनावरांची साडेसहा लाख रुपयांची भरपाई संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
राज्यातील अतिदुर्गम तालुका असलेल्या राजगड सह्याद्रीच्या उंच डोंगररांगात वसला आहे. सिंहगड किल्ल्याच्या पश्चिमेपासून तोरणा, राजगड असे गडकोटांचा अतिदुर्गम भागापासून रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत तालुक्याचा विस्तार आहे. या परिसरात वन विभागाचे जवळपास दहा हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे. उंच डोंगररांगा, घनदाट जंगल आणि गर्द झाडी- झुडपांनी वेढल्या आहेत. त्यामुळे बिबट्यांसह तरस, रानकुत्री असे हिंस्र वन्यप्राण्यांचा अधिवास या जंगलात वाढला आहे. कोकणापर्यंत दाट जंगलाचा विस्तार असल्याने हरीण, चितळ सांबर, रानगवे आदी वन्यजीवांचा अधिवासही येथे आढळून येतो.
पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने दरवर्षी पुणे वन विभागाला देण्यात येणारा निधी यंदा वर्ष संपत आले तरी मिळालेला नाही. त्यामुळे बिबट्यांची संख्या, हल्ले वाढले असतानाही वन विभागाला प्रभावीपणे उपाययोजना करण्यात अडचणी येत आहेत.
बिबट्यांचा धुमाकूळ वाढल्याने राजगड तालुक्यातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. यंदा दिवाळीच्या सुट्टीत पानशेत वरसगाव धरण परिसरासह मढे घाट, राजगड, तोरणा किल्ल्यावर पर्यटकांची संख्या कमी झाली होती. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे, मात्र बिबट्यांच्या दहशतीमुळे रात्री मुक्कामी थांबणे पर्यटक टाळत असल्याचे चित्र आहे. सिंहगड, पानशेत भागात शनिवारी तसेच रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र सध्या वीस ते पंचवीस टक्के पर्यटक कमी झाले आहेत.
समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड वन विभाग