पुणे

सुधारणेच्या नावे माथाडी कायदा नामशेष करण्याचा डाव : डॉ. बाबा आढाव

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : माथाडी कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली कायदाच रद्द करण्याचा डाव आखला जात आहे. राज्य सरकारने आणलेले माथाडी कायदा सुधारणा विधेयक मागे घ्यावे व कायद्याला बदनाम करणार्‍या खंडणीखोरी व गुंडगिरीबाबत राज्यातील माथाडी संघटनांबरोबर चर्चा करावी, अशी मागणी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी केली. दरम्यान, राज्यामध्ये सर्व माथाडी संघटनांची माथाडी कायदा बचाव समिती स्थापन झाली आहे.

समितीच्या बैठकीत राज्यातील सर्व हमाल मापाडी कामगार 14 डिसेंबर रोजी काम बंद ठेवतील, असा निर्णय घेण्यात आला असल्याचेही डॉ. आढाव यांनी या वेळी नमूद केले. डॉ. आढाव म्हणाले, आम्ही आमची संपूर्ण हयात माथाडी कायद्यासाठी घालवली. आता कायदा वाचवण्यासाठी प्राणाची बाजू लावू. ज्या पद्धतीने लोक पंढरीची वारी करतात त्याप्रमाणे मला हा कायदा वाचवण्यासाठी माझ्या सर्व कामगारांसहित जेलची वारी करायला सर्व जण तयार असल्याचे सांगितले.

तर, आपला भारत देश शेतकर्‍यांचा, जवानांचा, मजुरांचा बोलला जायचा, आज तोच देश भांडवलदारांचा, उद्योगपतींचा व ठेकेदारांचा झाला आहे. राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्तेच माथाडी कायद्याला बदनाम करीत आहेत. त्यामुळे गृहमंत्री त्यांच्यावर कारवाई न करता प्रामाणिक काम करणार्‍या माथाडी कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम करीत आहे. त्यामुळे 14 तारखेचा बंद हा फक्त विधेयक मागे घेण्यासाठी इशारा आहे. सरकारने आमची मागणी मान्य नाही केली तर संपूर्ण महाराष्ट्र बेमुदत बंद ठेवण्यात येईल, याची सरकारने नोंद घ्यावी, असा इशारा कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिला.

गुलटेकडी मार्केट यार्ड येथे पार पडलेल्या सभेवेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे राजकुमार घायाळ, सुभाष लोमटे, तोलणार संघटनेचे हनुमंत बहिरट, संतोष ताकवले, किशोर भानुसगरे, श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियनचे विशाल केकाने, सूर्यकांत चिंचवले, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संपत धोंडे, बाळासाहेब जाधव हमाल पंचायतचे गोरख मेंगडे, भारतीय कामगार सेनेचे दादा तुपे, महात्मा फुले कामगार संघटनेचे अंबर थिटे, टेम्पो पंचायतचे गणेश जाधव, चंद्रकांत जावळकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कामगार उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT