Pitru Paksha Pudhari
पुणे

Pitru Paksha Shraddha: पितृपंधरवडा सुरू; श्राद्धविधीत कावळ्याच्या ‘स्पर्शा’ची प्रतीक्षा, पूर्वजांच्या स्मरणाने भावनिक वातावरण

तर्पण, पिंडदान अन् श्राद्धविधींसाठी नदीकाठ व मंदिर परिसरात गर्दी; कावळ्याला पितरांचे प्रतीक मानण्याची लोकपरंपरा कायम

पुढारी वृत्तसेवा

सुरेश मोरे

कोंढवा: पितृपंधरवड्याला सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागात पूर्वजांच्या स्मरणार्थ श्राद्धविधी, तर्पण आणि पिंडदान करण्याची लगबग सुरू झाली आहे. हिंदू धार्मिक परंपरेनुसार पितरांचे स्मरण करून त्यांच्या आत्मशांतीसाठी विविध धार्मिक विधी केले जातात. या विधींमध्ये कावळ्याला विशेष महत्त्व असल्याने श्राद्धाच्या दिवशी कावळ्याने पिंडाला शिवावे, यासाठी भटजींकडून मंत्रोच्चारासह नातेवाईक कावळ्याला विनवणी करतानाचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पितृपंधरवडा हा आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कालावधी मानला जातो. कुटुंबातील दिवंगत व्यक्तीच्या तिथीनुसार श्राद्ध केले जाते.

सकाळपासूनच घरांमध्ये स्वच्छता करून स्वयंपाकाची तयारी केली जाते. पारंपरिक पद्धतीने विविध पदार्थ तयार करून पिंडदान, तर्पण, ब्राह्मण भोजन आदी विधी केले जातात. श्राद्धविधीमध्ये कावळ्याला अन्नाचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. लोकपरंपरेत कावळ्याला पितरांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कावळा येऊन नैवेद्याला स्पर्श करेपर्यंत कुटुंबीय प्रतीक्षा करतात. अनेकदा कावळा परिसरात असूनही पिंडाजवळ येत नसल्याने भटजींकडून मंत्रोच्चार करीत त्याला बोलावले जाते. कावळ्याने पिंडाला स्पर्श केल्यानंतर श्राद्धविधी पूर्ण झाल्याचे समाधान कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसून येते.

धार्मिक विधींसोबत भावनिक नाते

पितृपंधरवडा हा केवळ धार्मिक विधींचा कालावधी नसून कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देणारा काळ म्हणूनही पाहिला जातो. अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी पूर्वजांच्या आठवणी सांगितल्या जातात. त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार केले जातात. ज्येष्ठ व्यक्तींकडून पूर्वजांच्या आठवणी आणि कुटुंबाचा इतिहास पुढील पिढीला सांगितला जातो.

कावळ्याला दिले धार्मिक महत्त्व

श्राद्धाच्या वेळी कावळा पिंडाला शिवणे शुभ मानण्याची परंपरा महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत आढळते. मात्र, कावळा हा पितरांचा (आत्म्याचा) प्रत्यक्ष प्रतिनिधी आहे, असे पूर्वीपासून मानले जाते. कावळ्याला दिले जाणारे महत्त्व हे प्रामुख्याने धार्मिक श्रद्धा, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक प्रतीकात्मकतेशी संबंधित आहे. दरम्यान, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक कुटुंबांमध्ये पारंपरिक श्राद्धविधी करण्याच्या पद्धतींमध्ये बदल होत असला, तरी पूर्वजांचे स्मरण आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आजही कायम असल्याचे चित्र आहे.

नदीकाठ, मंदिर परिसरातही गर्दी

पितृपंधरवड्याच्या काळात नदीकाठ, घाट तसेच विविध मंदिर परिसरात तर्पण आणि पिंडदानासाठी भाविकांची गर्दी होत आहे. पुरोहितांकडून विधींचे मार्गदर्शन केले जात असून, कुटुंबातील दिवंगत व्यक्तीच्या तिथीनुसार धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. काही ठिकाणी सामूहिक श्राद्धविधीही आयोजित केले जात आहेत. या काळात धार्मिक साहित्य, पूजासाहित्य तसेच श्राद्धासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीलाही मोठी मागणी दिसून येत आहे.

पितृपंधरवड्याच्या निमित्ताने पूर्वजांचे स्मरण, त्यांच्या संस्कारांची आठवण आणि पुढील पिढीपर्यंत कुटुंबाची परंपरा पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कावळ्याच्या आगमनाची प्रतीक्षा, भटजींचे मंत्रोच्चार आणि पूर्वजांविषयीची भावनिक कृतज्ञता, असे चित्र या काळात सर्वत्र पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT