नरेंद्र साठे :
पुणे : अर्धवट कामे करा आणि बिले काढा. अगोदर पाइप लाइन करा आणि मग विहिरी खोदा, असे उलटे प्रकार पुणे जिल्ह्यात सुरू आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये हे प्रकार घडत आहेत. पाण्याचा सोर्स न मिळताच पाइप लाइन केल्याने गावे तहानलेलीच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
साधारणपणे कुठलाही शेतकरी पाइप लाइन शेतात घेऊन जाण्यासाठी अगोदर पाण्याचा सोर्स बघतो. विहीर खोदून पाणी किती आहे हे बघून मगच पाइप लाइन करण्याचा धाडस करतो. याच्या अगदी उलट कामे ही शासकीय योजनेची होत आहेत. प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशनची घोषणा केली. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार पन्नास-पन्नास टक्के खर्च करत आहे. छोट्यातल्या छोट्या गावात लाखो रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आल्यानंतर अनेकांनी यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि निविदांपासूनच चढाओढ सुरू झाली.
मात्र, यामध्ये कामांच्या गुणवत्तेकडे फारसे लक्ष ठेकेदारांनी दिलेले दिसत नाही. काही गावांमध्ये तर जुन्याच पाइप लाइनचा आधार घेतल्याचे काही तक्रारदार गावकर्यांनी म्हटले आहे. पुरंदर तालुक्यात एका गावात तर ओढ्याच्या लगत विहीर खोदली आहे. त्या ओढ्याला पाणी आल्यानंतर सरळ विहिरीत जाणार असल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे. या गावातदेखील अगोदर पाइप लाइन आणि मग विहीर खोदण्यात आली आहे.
कामांची बिले काढण्यासाठी पाइप लाइन अगोदर केली जातात. पाइप लाइन केल्यानंतर ठेकेदारांची जिल्हा परिषदेत बिले काढण्यासाठी गर्दी होताना दिसते. पुढील काम करण्यासाठी पैसे हवेत म्हणून ठेकेदारांकडून अर्धवट कामे करून बिले काढण्यावर भर दिला जात आहे. यावर काही गावांतील नागरिकांनी आक्षेप घेत, कामे पूर्ण करूनच बिले देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे मागणी केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात 1 हजार 224 जलजीवनची कामे सुरू आहेत. कामे अर्धवट ठेवून बिले काढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
हे ही वाचा :