वाल्हे : पिंगोरी (ता. पुरंदर) येथील एका शेतकऱ्याला शुक्रवारी (दि. 21) रात्री मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. शेतामध्ये पिकाला पाणी देताना त्या शेतकऱ्यासमोर बिबट्या हजर झाला. आपला मृत्यू समोर आहे, असे वाटत असतानाच शेतकरी हळूच शेतातून बाहेर पडले, तर बॅटरीच्या प्रकाशात बिबट्यानेही हल्ला केला नाही.
पिंगोरी (ता. पुरंदर) हे गाव डोंगर परिसरात वसलेले आहे. या परिसरात मागील अनेक वर्षांपासून बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे बोलले जाते. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता येथील शेतकरी प्रवीण शिंदे मठाच्या विहिरीवर शेताला पाणी देण्यासाठी गेले होते. शिंदे पिकांना पाणी देत असतानाच बांधावरून अंधारात काहीतरी चाललेले शिंदे यांना जाणवले. त्यांनी त्यादिशेने बॅटरीचा प्रकाश टाकला. त्यावेळी तो बिबट्या चालत असल्याचे दिसले. त्यानंतर तो काही वेळ जागेवरच थांबला व पुढे निघून गेला. या बिबट्याला पाहून भर थंडीत घाम फुटल्याने शेतकरी शिंदे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यामध्ये सध्या बिबट्याने उच्छंद मांडला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर या बिबट्याने हल्ला केला आहे. पुरंदर तालुक्यात पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडत आहेत.
शुक्रवारी रात्री शेताला पाणी देत बांधावरून बिबट्या चालत आल्याचे दिसले. बॅटरीचा उजेड त्याच्याकडे लावला. त्यानंतर तो काही काळ जागेवरच थांबला व पुढे निघून गेला. बिबट्याला पाहून माझ्यापुढे मृत्यू उभा होता. याबाबत पोलिस पाटलांना फोन करून माहिती दिली. त्यांनी तातडीने तिथून निघून जाण्यास सांगितले.प्रवीण शिंदे, शेतकरी, पिंगोरी
सध्या रब्बीचा हंगाम सुरू आहे. पाऊसही थांबला आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावे लागते. त्यात महावितरणकडून चार दिवस रात्रीची वीज दिली जाते. पिंगोरी गाव डोंगरदऱ्यात वसले आहे. त्यामुळे अनेक जंगली प्राणी या ठिकाणी आहेत. बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशावेळी शासनाने शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा.राहुल शिंदे, पोलिस पाटील, पिंगोरी