पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) वल्लभनगर, पिंपरी-चिंचवड विभागातून लालपरीची सेवा पूर्ववत झाली आहे. सध्या 30 गाड्या मार्गावर धावू लागल्या आहेत.त्यामुळे एस. टी. आगार प्रवाशांच्या गर्दीने फुलू लागले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांचा संप आता संपल्यात जमा आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सर्व कर्मचार्यांना 22 एप्रिलपर्यंत रुजू होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सूचनेप्रमाणे कर्मचारी कामावर हजर होत आहेत. गुरुवारपर्यंत 155 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत .
पिंपरी-चिंचवडमधून तुळजापूर, सोलापूर, उमरगा, लातूर, हैदराबाद, पंढरपूर, दापोली, चिपळूण, तीवरे, महाड , नाशिक, विजापूर, गाणगापूर या मार्गावर एकूण 30 बस सुरू झाल्या आहेत अशी माहिती स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांनी दिली.
दरम्यान, कामावर आल्यानंतर, एस. टी. कर्मचारी बसची पूजा करून कामावर रूजू होत आहेत. त्यामुळे एकूण माहोल काहीसा भावना दाटून येणारा दिसून येत आहे.
बस डिझेलसाठी पुणे – मुंबई महामार्गावरील एमपायर इस्टेट जवळील पेट्रोल पंपावर थांबत असल्याने बस सुरू झाल्याचे पिंपरी चिंचवडकरांना समजून येत आहे.
https://youtu.be/wimwsVNgHnY