पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भावी काळात पदवीपेक्षा कौशल्यांना जास्त महत्त्व राहील, असे प्रतिपादन अॅड. प्रवीण निकम यांनी केले.
चिंचवडमध्ये गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत 'युवकांसाठी महत्त्वपूर्ण कौशल्य व उच्चशिक्षणाची संधी' या विषयावर अॅड. निकम बोलत होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप अध्यक्षस्थानी होते. यावेळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, प्रा. मनीष केळकर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, विपुल नेवाळे उपस्थित होते.
अॅड. निकम म्हणाले की, आपल्या देशात पदवीला खूप महत्त्व दिले जाते; परंतु, कौशल्याअभावी पदवीधर युवकांना नोकर्या मिळत नाहीत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुमारे दोनशे विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या काही निकषांवर उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी इंग्लंड, अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ शकतात.
तेथे श्रमप्रतिष्ठेला महत्त्व असल्यामुळे आपल्याकडे ज्या नोकर्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये गणले जाते, अशा नोकर्या परदेशात चांगल्या घरातील विद्यार्थी करतात.
साहजिकच परदेशात उच्चशिक्षण घेताना त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक भार सहन करावा लागत नाही. तीच मानसिकता आपल्याकडे रुजवायला हवी.विजय बोत्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर धीरज गुत्ते यांनी यावेळी आभार मानले.