पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला तब्बल 46 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात बेड्या ठोकल्या. प्रमोद रवींद्र चिंतामणी (44, रा. 504, सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी, मूळ रा. कर्जुले हरियाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Latest Pune News)
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वकिली करतात. त्यांच्या आशिलाविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात आशिलाचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतील प्रमोद चिंतामणी याच्याकडे होता. या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या आशिलाला मदत करण्यासाठी तसेच, आशिलाचे अटक असलेले वडील यांच्या जामिन अर्जावर म्हणणे दाखल करण्यासाठी प्रमोद चिंतामणी याने सुरवातीला दोन लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र जसजसे त्यांचे मोठे आर्थिक व्यवहार समजल्यानंतर चिंतामणी याने 2 कोटी रुपयांच्या लाचेचा तगादा लावण्यास सुरुवात केली.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे या प्रकरणाची तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने या प्रकरणाची शहानिशा करून सापळा रचला. त्यानुसार रविवारी (दि. 2) प्रमोद चिंतामणी हा उंटाड्या मारूती मंदिरासमोर, रास्ता पेठ येथे तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता 46 लाख 50 हजार रुपये घेताना रंगेहात बेड्या ठोकण्यात आल्या. कारवाई दरम्यान 2 कोटी रुपयांपैकी 1 कोटी हे आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला तर एक कोटी स्वत:साठी मागितल्याचे देखील एसीबीने केलेल्या पडताळणीत समोर आले आहे. ही कामगिरी एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले, पोलिस उप अधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे यांच्या पथकाने केली.