पिंपरी : कुत्रा, मांजर आदी लहान प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचे दहन करण्यासाठी नेहरुनगर येथे महापालिकेची विद्युतदाहिनी आहे. मात्र, मोठ्या जनावरांसाठी विद्युत दाहिनीची सोय नाही. गाय, म्हैस, बैल यांसारख्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाल्यास त्यांचे दहन करण्यासाठी पुणे येथे न्यावे लागत आहे. पर्यायाने, त्यासाठी महापालिकेचा वेळ आणि अतिरिक्त पैसा खर्च होत आहे.
भोसरी एमआयडीसीत मोठी जनावरे एमआयडीसीच्या जागेत दफन करण्यात येत होती. मात्र, जागेची मालकी एमआयडीसीकडे गेल्याने पुणे महापालिकेच्या विद्युत दाहिनीत दहन करण्यासाठी जनावरांना न्यावे लागत आहे. एका जनावरासाठी महापालिका तीन हजार रुपये इतके शुल्क देत आहे. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने ठेकेदारी तत्त्वावर काम दिले होते. मात्र, ऑक्टोबर 2023 पासून ठेकेदाराने काम थांबवले आहे. जनावरे उचलण्याच्या कामासाठी नवीन निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसार, एका वर्षासाठी 2 कोटी 19 लाख रुपये खर्च येणार आहे. तर, दहनासाठी प्रति जनावर महापालिका 3 हजार रुपयांचा वेगळा खर्च करणार आहे.
शहरातील मृत झालेल्या सरासरी 350 ते 400 मोठ्या जनावरांचे महापालिकेच्या वतीने दरवर्षी मोफत दहन करण्यात येते. सध्या त्यांच्या दहनासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये विद्युतदाहिनी नसल्याने पुणे येथील पुणे महापालिकेच्या विद्युतदाहिनीत त्यांचे दहन केले जात आहे. शहरात मोठ्या जनावरांसाठी विद्युत दाहिनी व्हावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केलेली आहे.
– डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.
हेही वाचा