Pimpri News : घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्रास नागरिकांचा विरोध | पुढारी

Pimpri News : घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्रास नागरिकांचा विरोध

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : जाधववाडी, चिखली येथील महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय घोडेस्वारी (हॉर्स राईडींग) प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्या केंद्रामुळे स्थानिकांना या मैदानात व्यायाम व सराव करता येणार नाही. त्यामुळे या केंद्रास विरोध करण्यात येत असून, उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शहरातील खेळाडूंना घोडेस्वारीचे प्रशिक्षण मिळावे. त्यातून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत म्हणून महापालिकेने हे केंद्र सुरू केले आहे.

त्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता 9 एप्रिल 2023 ला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे. हे प्रशिक्षण केंद्र 3 वर्षे कालावधीसाठी कृष्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठानला देण्यात आले आहेत. त्या माध्यमातून शहरातील खेळाडूंना घोडेस्वारीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. तेथे एकूण प्रशिक्षणार्थीपैकी 40 टक्के मोफत प्रशिक्षण शहरातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

श्रीमंत लोकांसाठी घोडेस्वारीचे केंद्र सुरू करण्याचा घाट

आल्हाट यांनी सांगितले की, या भागातील हे एकमेव सोईस्कर असे मैदान आहे. मात्र, काही श्रीमंत लोकांसाठी घोडेस्वारीचे केंद्र सुरू करण्याचा घाट महापालिकेच्या अधिकार्‍यांनी घातला आहे. त्यामुळे येथील स्थानिक मुले-मुली, प्रौढ व ज्येष्ठांना सरावासाठी मैदान राहणार नाही. नागरिकांचे हक्काचे मैदान हिरावले जात आहे. त्याच्या विरोधात अनेक पत्र दिले. मात्र, पालिका प्रशासनाकडून त्याला उत्तर देण्यात आले नाही. जोपर्यंत घोडेस्वारी केंद्र बंद केले जाणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालिका क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन महापालिकेची भूमिका स्पष्ट केली.

या केंद्रासाठी त्या मैदानास सीमाभिंत टाकण्यात आली आहे. मैदानावर खोल्या तसेच, स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. सरावासाठी आवश्यक साहित्य लावण्यात येत आहे. तसेच, इतर आवश्यक कामे करण्यात येत आहेत. लवकरचा प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. या केंद्राच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रूपाली आल्हाट यांनी मंगळवार (दि.28) पासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्याला नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. तसेच, सह्यांच्या मोहिमेस प्रतिसाद मिळत आहे.

महापालिकेच्या या मैदानावर घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र इतर ठिकाणी हलवावे, यासाठी तीन दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याचे म्हणणे समजून घेतले आहे. आंदोलनकर्ते व आयुक्तांशी बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यात त्यावर चर्चा केली जाईल, असे पत्र आंदोलनकर्त्यांना गुरुवारी (दि. 30) दिले आहे.

– मिनीनाथ दडवंते, उपायुक्त, क्रीडा विभाग

हेही वाचा

Back to top button