हिंजवडी : जागतिक नकाशावर नाव असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतचा अजब कारभार समोर येत आहे. मागील 8-9 महिने म्हणजेच तब्बल जानेवारीपासून आयटीनगरीची पाणी योजना बंद असून, त्याबाबत अपेक्षित कारवाई होत नाही. सरपंचपदी तीन-तीन महिने वाटून घेणार्या आणि सत्तेसाठी देशभर फिरणार्या लोकप्रतिनिधींना मात्र याचा विसर पडलाय का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
कोट्यवधीचा निधी खर्च करून येथील ब्लु-रिच सोसायटीजवळ मुठा नदीच्या काठावर असलेल्या पाणी योजनेतून प्रतिदिनी 5 लाख शुद्ध पिण्याचे पाणी हिंजवडीकरांना मिळत होते. मात्र, योजनेच्या दुरुस्तीअभावी नागरिकांना पाण्याविना राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, एमआयडीसीच्या वतीने पिण्यासाठी वाढीव पाणी मिळण्याबाबत ग्रामपंचायत आग्रही असून, त्याबाबत नुकतीच मागणी करण्यात आली आहे. मात्र, स्वतःची हक्काची पाणी योजना सुरू करण्यात मात्र ग्रामपंचायत सक्षम आहे का? हा सवाल उपस्थित होत आहे.
हिंजवडीसाठी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. यासाठी अनेक उपलब्ध पर्याय अवलंबून पाहण्यात येत आहेत. यात वाकड येथील शेतकर्यांची अपूर्ण पाणी योजना पूर्ण करण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यास खीळ बसली आहे. मुळशी प्रादेशिक पाणी योजना 2 हा पर्यायदेखील होता. मात्र, एमआयडीसी हा सोपा पर्याय आता प्रत्येक सरपंच अंमलात आणत आहे. पदावर बसल्यावर प्रथम एमआयडीसीकडे यासाठी पत्रव्यवहार करण्यात येतो. दरम्यान, मागील पंधरा-वीस वर्षांत एमआयडीसीदेखील 5 लाख लिटर पाणी हिंजवडीसाठी देत होती. सुमारे 5 महिन्यांपूर्वी हे पाणी वाढवून 10 लाख लिटर देण्यात येत आहे. परंतु, नव्याने अधिकच्या पाण्यासाठी मागणी केली जात आहे.
दरम्यान हिंजवडीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतच्या रोजच्या वापरासाठी 25 लाख लिटर पाणी आवश्यक आहे. परंतु, आज अखेर एमआयडीसीच्या कृपेने केवळ 10 लाख लिटर पाणी मिळत आहे. त्यामुळे हे पाणीवाटप येथील ग्रामपंचायतच्या वॉर्डनिहाय केले जाते. त्यामुळे ज्या नागरिकांचे पाणी कनेक्शन आहे. त्यांनादेखील एक-दोन दिवसांच्या कालावधीनंतर पाणी मिळत आहे.
ही पाणी योजना बंद असूनही मागील 8-10 महिन्यांत या योजनेवर सुमारे 50 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच, पाणी उपसा करण्यासाठी असलेल्या मोटर, जॅकवेल, फिल्टर यासाठी निधी उपलब्ध असूनदेखील त्यासाठी खर्च करण्यात येत नाही. त्यासाठी 'नक्की काय गौडबंगाल आहे' याकडे नागरिकांचे लक्ष आहे. तसेच, या पाणी योजनेची पाइपलाइन नादुरुस्त असल्याचे ग्रामसभेत सांगितले जात आहे. परंतु, गेली अनेक महिने संबंधित पाइपलाइन का दुरुस्त होत नाही, याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. दरम्यानच्या काळात चार सरपंच, दोन ग्रामसेवक यांनी गावचा कारभार पहिला आहे.
येथील पाणी योजनेस सुरुवातीपासून खर्च करण्यात आला असूनही आतादेखील मोठ्या प्रमाणावर खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यात जॅकवेल बसवणे, नादुरुस्त पाइपलाइन दुरुस्त करणे, फिल्टर प्लांट आणि रम बांधणे अशी कामे आहे. मात्र, ही कामे मंजूर असूनदेखील अद्यापही ही कामे सुरू करण्यात आली नाहीत. लोकाभिमुख कामे करण्यापेक्षा अंतर्गत राजकारण आणि गटबाजीमुळे विकासास खीळ बसत आहे.
जानेवारीपासून हिंजवडी येथील पाणी योजना बंद आहे. वारंवार याकडे लक्ष वेधूनही गावचे कारभारी याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ पाण्याअभावी तक्रारी करत आहेत. दूरदृष्टीचा अभाव आणि दर्जेदार कामाच्या अभावामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सदर पाणी योजना जुनी आहे त्यास वेळीच दुरुस्त करणे अपेक्षित आहे.
– शिवनाथ जांभुळकर, माजी सरपंच
हेही वाचा