Pune : वाल्हे बसस्थानक पाडल्याने प्रवाशी उन्हातच | पुढारी

Pune : वाल्हे बसस्थानक पाडल्याने प्रवाशी उन्हातच

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणामध्ये मागील महिन्यात वाल्हे (ता.पुरंदर) येथील बसस्थानक पाडले असल्याने प्रवाशांना उन्हातच उभे राहून एस. टी. बसची वाट पाहावी लागत आहे. बसस्थानक नसल्याने चालकांना बस थांबा लवकर लक्षात येत नसल्याने अनेक एस. टी. बस जुन्या बस स्थानकाच्या जागेच्या मागे किंवा पुढे जाऊन थांबत असल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे. ऐन सण-उत्साहात पुणे- पंढरपूर पालखी मार्गावरून धावणार्‍या एस. टी. बसची संख्या कमी पडत आहे. निरा बाजूकडून येणा-या सर्वच एस. टी. बस बहुतांश भरून येत असल्याने प्रवाशांना गाडीत उभे राहण्यासाठी ही जागा मिळत नसल्याने वयोवृद्ध प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहेत. वाल्हे येथे प्रवाशांना काही दिवसांपासून दोन-तीन तास ताटकळत थांबावे लागत आहे, अनेकांनी खासगी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे पसंत केले. पुढील काळात सण उत्साहाच्या वेळी एस टी बसची संख्या पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावर वाढवावी, अशी मागणी प्रवाशीवर्गातून होत आहे.

‘पीएमपील’ची सेवा सुरू करावी
मागीलवर्षी जून महिन्यांच्या सुरुवातीला ‘पीएमपील’ची या भागातील बस सेवा बंद करण्यात आली. निरा ते हडपसर पीएमपीएल बस सेवा उत्तम सुरू होती. वाल्हे, निरा परिसरातील अनेकजण कामानिमित्त दररोज पुणे, पिंपरी- चिंचवड शहरामध्ये ये-जा करतात. तसेच शाळा, कॉलेज या निमित्तानेदेखील अनेक विद्यार्थी या मार्गावरील पीएमपीएल बसने प्रवास करणे सोपे जात होते. मात्र, पीएमपील प्रशासनाकडून ही बस सेवा बंद करण्यात आल्यापासून प्रवाशीवर्गाचे दररोज हाल सुरू आहेत. पुन्हा पीएमपीलने निरेपर्यंत बस सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

Back to top button