पिंपरी : वर्षा कांबळे : सध्या शहरामध्ये अनेक वेळा भटक्या कुत्र्याने चावा घेण्याबरोबरच नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाकडून गेली पाच महिने कुत्रे पकडण्याचे काम बंद आहे.
त्यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असून, त्यांच्या संख्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एप्रिल 2021 ते मार्च 2022 या वर्षात 13 हजार 892 व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
शहरात कचर्याच्या समस्येमुळे आजारांनी थैमान घातले आहे. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय भेडसावतो आहे तो म्हणजे भटक्या कुत्र्यांचा. भटक्या कुत्र्यांची संख्या शहरात वाढली आहे.
रस्त्याने जाताना विशेषत: रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी कुत्र्यांच्या झुंडीने अंगावर धावून येणार्या घटना शहरात घडत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक महापालिकेच्या रुग्णालयामध्ये व दवाखान्यामध्ये एक किंवा दोन तरी कुत्रा चावलेले रुग्ण येतात, तर खासगी रुग्णालयांतही रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
कुत्र्यांना महापालिकेचे कर्मचारी पकडून नेतात. त्यांच्यावर नसबंदी करून पुन्हा परिसरात सोडतात, तरीदेखील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झालेली दिसून येत नाही. शहरामध्ये या भटक्या कुत्र्यांना खायला प्यायला देऊन भूतदया दाखविणारे नागरिकही आहेत.
भटक्या कुत्र्यांना भूतदया दाखविली नाही, तरी त्यांना रस्त्यावरील कचराकुंड्यांमध्ये फेकण्यात येणार्या अन्नाचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. कचर्यांच्या ढिगामध्ये भटक्या कुत्र्यांना अन्नपदार्थ सहजपणे मिळतात. त्यामुळे त्या भागात कुत्र्यांची संख्या वाढते.
सध्या पाच महिन्यांपासून कुत्रे पकडण्याचे काम बंद आहे. यासाठी महापालिका स्वत:ची यंत्रणा राबविणार आहे. त्यासोबतच निर्बिजीकरणाचे काम दुसर्या एका खासगी संस्थेला देण्यात येणार आहे. थोड्याच दिवसात शस्त्रक्रिया सुरू करण्यात येतील. ही संस्था मोफत निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणार आहे. अशाप्रकारे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले जातील.-डॉ. अरुण दगडे (पशुवैद्यकीय अधिकारी)
यापूर्वी महापालिकेने कुत्रे पकडण्याचे काम पीपल फॉर अॅनिमल पुणे व सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन यांना दिले होते. या संस्थेची डॉग व्हॅन येवून शहरातील प्रभागानुसार फिरुन रोज 15 ते 20 भटकी कुत्री पकडत होती.
मात्र, सध्या पाच महिन्यापासून कुत्रे पकडण्याचे काम बंद आहे. त्यामुळे निर्बिजीकरण शस्त्रक्रिया देखील बंद आहेत. यामुळे देखील शहरात भटक्या कुत्र्यांचेे प्रमाण वाढले आहे.
कुत्र्यांना महापालिकेचे कर्मचारी पकडून नेतात. त्यांच्यावर नसबंदी करून पुन्हा परिसरात सोडतात. तरीदेखील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झालेली दिसून येत नाही.
त्यामुळे महापालिकेकडून करण्यात येणारे निर्बिर्जीकरण फक्त कागदावरच असल्याचे दिसून येते. एका कुत्र्यावर 999 रुपये इतका शस्त्रकियेचा खर्च येतो. यासाठी महापालिकेने 2 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.