पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील एका गोदामाला सोमवारी (22 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. बघता-बघता आगीचा मोठा भडका उडाला. स्थानिक रहिवाशांनी घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर चाललेल्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली खरी पण या आगीत दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. वाल्हेकरवाडी परिसरात ही घटना घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत असून पुन्हा एकदा अनधिकृत पोट माळ्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी परिसरात अनाधिकृत पोट माळे आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेने या पोटमाळ्यांचे सर्वे केले होते. मात्र, हे सर्वे फोल ठरल्याचं दिसून आलं. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका पोटमाळ्यातील गोदामाला अचानक आग लागली. यावेळी दोन तरुण पोटमाळ्यावर अडकून पडले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आगीच्या धुरात घुसमटून दोन्ही तरुण बेशुद्ध झाले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, आगीत दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांची नावे अद्याप समोर आली नाही.
हेही वाचा