युद्ध लढाव व जिंकाव मराठ्यांनीच : मनोज जरांगे पाटील | पुढारी

युद्ध लढाव व जिंकाव मराठ्यांनीच : मनोज जरांगे पाटील

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : युद्ध लढाव मराठ्यांनी व जिंकाव मराठ्यांनीच अशी चेतना उपस्थित सकल मराठा समाजामध्ये चेतवत मुंबईमध्ये सरकारकडून त्रास दिल्यास महाराष्ट्राच्या रस्त्या-रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे, असे आवाहन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी करतानाच मराठा समाजासाठी ओबीसीतूनच आरक्षण घेणारच या मागणीचा पुनरुच्चार केला. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल साडेसात तास उशिराने मंगळवारी (दि. २३) पहाटे अडीचच्या दरम्यान कारेगाव रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. कडाक्याच्या थंडीत देखील मोठा जनसमुदाय जरांगे यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होता. शिरूर तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांचे आगमन झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने लोक रस्त्याच्या कडेने गावागावामध्ये उभे होते.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून आरक्षण आपण आता घेतल्यात जमा आहे. या दृष्टीने सकल मराठा समाजाने मुंबईकडे कुच केली असून आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. प्रत्येक वेळी सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. पहिल्यांदाच मराठ्यांमध्ये एकजूट झाली आहे. यातही फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. यासाठी काहीजण देव पाण्यात बुडवून आहेत. अशीच एकी पुढे राहिली तर जगामध्ये मराठा समाज प्रगत म्हणून पुढे येईल. शिक्षण व नोकरीमध्ये आपला टक्का वाढला पाहिजे. देव आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण घेणारच याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

अनेक राजकीय पक्षाचे नेते आपण मोठे केले आणि एकही नेता आरक्षणाच्या बाजूने बोलायला तयार नाही. अधिवेशनात स्वार्थासाठी राजकीय नेते बोलले. आरक्षणाच्या आड नेते आले तर त्यांचा राजकीय सुपडा साफ करू. राजकारण न कळण्याइतके आता मराठी दूधखुळे पुढे राहिलेले नाहीत. यांची मुले परदेशात शिकणार व आमची मुले काय ऊस तोडीला जाणार का? मी मॅनेज होत नाही हीच सरकारपुढे खरी डोकेदुखी आहे. मंत्र्यांच्या तब्बल २७-२८ बैठका झाल्या, परंतु एकदा आलेला मंत्री परत पुन्हा येतच नाही. ५४ लाख नोंदीची कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्याची सरकारला मागणी केली असून एका नोंदीवर किमान पाच प्रमाणपत्र मिळाली तर तब्बल अडीच कोटी मराठा आरक्षणात आल्यात जमा आहेत. या सर्वांच्या सगे-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, असा वटहुकूम अथवा अध्यादेश काढा अशी सरकारकडे मागणी आहे. मी असो किंवा नसो विचार जिवंत ठेवा व एकी ठेवा असा निर्वाणीचा इशारा देताना जरांगे पाटील यांनी सरकारने मुंबईत त्रास दिला तर महाराष्ट्राच्या रस्त्या-रस्त्यावर मराठा उतरला पाहिजे, असे आवाहन यावेळी केले.

हेही वाचा

Back to top button