Khelo India Youth Games 2024 : महाराष्ट्राचे खेळाडू चमकले | पुढारी

Khelo India Youth Games 2024 : महाराष्ट्राचे खेळाडू चमकले

चेन्नई, पुढारी वृत्तसेवा : येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत रविवारचा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजविला. ज्युदो, तलवारबाजी आणि कबड्डी या तीन खेळ प्रकारांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकली. ज्युदोमध्ये 1 रौप्य, 2 कांस्य, तलवारबाजीमध्ये 1 रौप्य व 2 कांस्य, तर कबड्डीमध्ये मुलांनी कांस्य पदकाची कमाई केली.

ज्युदोच्या 55 किलो गटात महाराष्ट्राच्या मोहित मौल्या याला अंतिम फेरीत पंजाबच्या शिवांश वशिष्ठचे आव्हान होते. मोहितच्या तुलनेत शिवांश वशिष्ठ उंच असल्याने, त्याला याचा फायदा अंतिम लढतीत झाला. मात्र, मोहितने देखील चांगली झुंज दिली. निर्धारित वेळेत दोन्ही खेळाडू गुण मिळवू शकले नाहीत. तेव्हा लढत गोल्डन स्कोअरमध्ये (सडनडेथ) गेली. यावेळी शिवांश वशिष्ठने एका गुणाची कमाई करताना सुवर्ण पदक कमावले. मोहित हा ठाणे शहरात मंगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. मोहितने राज्य स्तरावर आणि सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन पदके जिंकली आहेत.

पुण्याच्या ओमने जिंकले कांस्य

ज्युदोमध्ये 55 किलो गटात पुण्याच्या ओम हिमगिरेने कडवी झुंज देताना पदार्पणातच कांस्य पदक जिंकले. त्याने हरयाणाच्या बाबूराम याला पराभूत करताना ही कामगिरी केली. मुलींच्या 48 किलो गटात ठाण्याच्या भक्ती भोसले हिने पदार्पणातच कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकाच्या लढतीत चिवट झुंज देत भक्तीने पश्चिम बंगालच्या ऐश्वर्या रॉयला पराभूत केले.

तलवारबाजीत तीन पदके

तलवारबाजीमध्ये तेजस पाटील याने रौप्यपदक पटकावले, तर रोहन शहा व शिरीष अनगळ यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकले. फॉईल या क्रीडा प्रकारामध्येच रोहन याने या स्पर्धेत कांस्य पदक मिळवले असले तरी त्याने दाखवलेले कौशल्य खूपच कौतुकास्पद होते.

कबड्डी : अंतिम फेरीचे स्वप्न भंगले

कबड्डीमध्ये अंतिम फेरी गाठण्याचे महाराष्ट्राच्या मुलांचे स्वप्न उपांत्य फेरीतील पराभवामुळे भंगले. एकतर्फी झालेल्या उपांत्य लढतीत बलाढ्य हरियाणा संघाने 45-28 असा महाराष्ट्रावर सफाईदार विजय नोंदविला. या पराभवामुळे महाराष्ट्राला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राचा धडाका

महाराष्ट्राच्या शाश्वत तिवारीने तेलंगणाच्या सलमान राजला पराभूत करून 54-57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडक दिली. मुलींच्या गटातदेखील महाराष्ट्राच्या मुलींनी चमकदार कामगिरी बजावताना 3 मुलींनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. 50-52 वजनी गटातून देविका सत्यजितने पश्चिम बंगालच्या त्रिलेखा गुरांगला पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. 52-54 किलो वजनी गटात प्रियानी शिर्केने उत्तराखंडच्या भूमिका महरला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. मात्र, 48-50 किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या खुशी जाधवला हिमाचल प्रदेशच्या कशिशकडून, तर 54-57 किलो गटात स्वप्ना चव्हाणला मध्य प्रदेशच्या अंजली सिंगकडून पराभव स्वीकारावा लागला.

Back to top button