पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चार जणांनी मिळून दोघांना बांबूने मारहाण करीत त्यांची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 7) दुपारी साडेतीनच्या सुमारास केशवनगर, चिंचवड येथे घडली.
यश राजू जाधव (20, रा. केशवनगर, चिंचवड), साहिल काकरिया अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी यश जाधव यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकी घोलप, जॉनी जगताप, शुभम चौधरी आणि बद्र्या (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी आणि त्यांचा मित्र साहिल या दोघांना बांबूच्या काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
तसेच, त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांची 60 हजार रुपये किमतीची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.