पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबुत परिसरात बिबट्यांचा वाढता वावर आणि होणाऱ्या हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. दि. 12 ऑक्टोबर रोजी एका चिमुकलीच्या बळीनंतर बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली. त्यात आजपर्यंत तब्बल 16 बिबट्यांना जेरबंद करण्यात आले तसेच एका नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले. असे असूनही बिबट्यांचे मानव व पशुधनावर दिवसाढवळ्या होणारे हल्ले सुरूच असल्याने परिसरातील नागरिकांमधील भीती कायम आहे.
इतक्या मोठ्या संख्येने बिबट्यांना पकडूनही त्यांचा परिसरातील वावर थांबलेला नाही. नागरिकांना दिवसाढवळ्या बिबटे व बछडे एकत्र दिसत आहेत तसेच पशुधनावरील हल्ले सुरूच आहेत. या परिसरातील बिबट्यांची दहशत कायम आहे. अजून किती बिबटे शिल्लक आहेत? आम्हाला सुरक्षितता कधी मिळणार? असे प्रश्न शेतकरीवर्गाने उपस्थित केले आहेत.
पिंपरखेडमध्ये 12 ऑक्टोबर रोजी शिवन्या बोंबे या साडेपाच वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर 22 ऑक्टोबर रोजी जांबुत येथे 80 वर्षीय भागूबाई जाधव यांचा, तर पिंपरखेडमध्ये 2 नोव्हेंबर रोजी रोहन बोंबे 13 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. अवघ्या 20 दिवसांत तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. नागरिकांमध्ये तीव संतापाची लाट उसळली. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याने 35 पिंजरे लावले.
नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी शार्पशूटर तैनात करण्यात आले. या चाळीस दिवसांच्या कालावधीत जांबुत घटनास्थळ परिसरात 4, तर पिंपरखेडमध्ये 8 बिबटे जेरबंद झाले. एका नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले, तर दोन बिबट्यांना बेशुद्ध करून पकडण्यात आले. फाकटे व टाकळी हाजी येथे प्रत्येकी एक, असे पिंपरखेड बीटअंतर्गत 17 बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात आल्याचे शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
बिबट्यांना जेरबंद करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आली आहे. परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवली आहे. कॅमेरे आणि थर्मल ड्रोनच्या मदतीने बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. जोपर्यंत बिबट्यांचा धोका कमी होत नाही तोपर्यंत बिबट्यांना पकडण्याची मोहीम वन विभागाकडून सुरूच राहणार आहे.प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर