Crime News Pudhari
पुणे

Junnar Crime: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरण; पीडित कुटुंबाला राष्ट्रवादीकडून ५ लाखांची मदत

दिलीप वळसे पाटील यांची कुटुंबीयांची भेट; आरोपीविरोधात १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याच्या पोलिसांना सूचना

पुढारी वृत्तसेवा

आळेफाटा: पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर आमदार दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि. २३) सायंकाळी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.

वळसे पाटील हे माजी आमदार अतुल बेनके यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी तपासाला गती देऊन १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. न्यायालयीन लढ्यासाठी सक्षम वकील उपलब्ध करून देण्याबाबतही योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पीडित कुटुंब आर्थिक अडचणीत असून, त्यांना या संकटातून बाहेर काढणे, तसेच कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाला मदत करणे हे प्राधान्य राहील. आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध योजनांचा लाभही कुटुंबाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे. गावातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलिसांनी सतर्कता वाढवावी, अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी माजी आमदार बेनके यांनीही भावना व्यक्त केल्या. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद लेंडे, पांडुरंग पवार, बाजार समिती सभापती संजय काळे, माजी सभापती रघुनाथ लेंडे, भानुदास लेंडे, सुप्रिया लेंडे, विनायक तांबे, सोमनाथ माळी, श्याम माळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT