

भीमाशंकर: श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसर श्रावणातील दुसऱ्या सोमवारी (दि. २४) दाट धुक्याने व्यापला होता. बोचरी थंडी आणि श्रावण सरींचा आनंद घेत भाविक भक्तिभावाने दर्शनासाठी दाखल झाले होते. पहाटे ५ नंतर महापूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. ‘भीमाशंकर महाराज की जय’च्या घोषणेने मंदिर परिसर दुमदुमून गेला. सुमारे अडीच लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.
शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे भीमाशंकर येथे गर्दीचा महापूर लोटला होता. या दोन दिवसांत सुमारे लाख भाविकांनी दर्शन घेतले, तर सोमवारीही मोठ्या प्रमाणावर गर्दी कायम होती. कोकणातून कर्जत, खांडजमार्गे बैलगाडा घाट आणि गणपती घाटातून पायी येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरू आहे. घाटातील पायवाटा निसरड्या झाल्या असतानाही भाविक पायपीट करून भीमाशंकर गाठत आहेत.
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून, पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे वर्षभर येथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी असते. श्रावण महिन्यात ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. पाऊस, दाट धुके आणि बोचरी थंडीची पर्वा न करता भाविक महादेवदर्शनासाठी येत आहेत. मंदिर परिसरातील मुखदर्शन आणि पास सुविधेमुळे दर्शनव्यवस्था सुलभ झाली आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी घोडेगाव आणि खेड पोलिस ठाण्यांकडून एक पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक, नऊ पोलिस उपनिरीक्षक तसेच १०२ पुरुष व महिला पोलिस कर्मचारी, असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एस. टी. महामंडळाचे वाहतूक नियंत्रक मारुती खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ४० मोठ्या बसगाड्यांची वाहनतळ ते बसस्थानक सेवा सुरू ठेवण्यात आली होती.
भीमाशंकरचे सरपंच दत्तात्रय हिले, देवस्थान विश्वस्त मधुकर गवांदे, चंद्रकांत कैदरे आदी यात्रेच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्बशोधक पथक, सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारीतील यात्रेकरूंची तपासणी, मंदिराजवळ आणि पायऱ्यांच्या सुरुवातीला वॉच टॉवर, डॉग स्क्वाॅड तसेच हँड मेटल डिटेक्टर तैनात करण्यात आले आहेत. मद्यसेवन करून येणाऱ्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.