नारायणगाव : पिंपळवंडी परिसरातील काकटपट, गाजरपट, तोतरबेट भागात बिबट्याचे दर्शन दररोज होत असून, शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे बंद केले असून, लहान मुलांना घराबाहेर खेळण्यासही मनाई केली आहे.(Latest Pune News)
परिसरातील शेतकरी म्हणतात की, बिबट्यामुळे शेतातील काम करणे कठीण झाले आहे, तसेच दुभत्या जनावरांना हिरवा चारा देणेही मोठी समस्या बनली आहे. दसऱ्याच्या दिवशी मयूर नेताजी वाघ यांच्या घरात बिबट्याने घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु घरातील तीन मुले, त्यांची मुलगी व पत्नी यांनी बिबट्याला पिटाळून लावले. या घटनेनंतर त्यांनी तीनही मुलांची शाळा बंद केली असून त्यांना घरीच अभ्यास करण्यास सांगितले आहे.
गेल्या महिनाभरापासून आमच्या मळ्यात दोन बिबटे फिरत आहेत. शनिवारी (दि. 4) रात्री अरुण गाजरे यांच्या गायीच्या गोठ्यात दोन बिबटे दाखल होऊन वासरू ठार केल्याची घटना घडली. रविवारी (दि. 5) सकाळी मजूर सोयाबीन काढत असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले, असे तोतरबेट येथील शेतकरी अंकुश तोत्रे यांनी सांगितले. या भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव संताप व्यक्त केला जात आहे. परिसरातील नागरिकांनी आमदार शरद सोनवणे यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
पिंपळवंडी परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. मयूर वाघ यांच्या घराजवळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे, तसेच गाजरपट भागात देखील पिंजरा लावण्याची योजना आखली आहे.प्रदीप चव्हाण, वनक्षेत्र अधिकारी
सिंहगड, पानशेतमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ
वेल्हे : पानशेतसह आंबी, कादवे, रुळे, कुरण, आतकरवाडी, डोणजे परिसरात बिबट्यांचा हैदोस सुरू आहे, त्यामुळे गुराख्यांसह स्थानिकांत दहशत पसरली आहे. आंबी (ता. हवेली) येथे शुक्रवारी (दि. 3) दुपारी मधुकर पाटील यांच्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी बिबट्याने म्हशीच्या रेडकाला चावा घेतला. त्यावेळी कळपातील एक म्हैस बिबट्याच्या अंगावर धावून गेली. तेव्हा बिथरलेल्या बिबट्याने म्हशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र म्हशीचे आक्रमक रूप पाहून बिबट्या जंगलात पसार झाला.
स्थानिक शेतकरी नाना निवंगुणे म्हणाले, आंबीच्या जंगलात 4 ते 5 बिबटे तळ ठोकून आहेत. सभोवती असलेल्या घनदाट जंगलात पाणवठे आणि खाद्य मुबलक प्रमाणात आहे. वन्यजीवांचा अधिवास वाढला आहे. हे बिबटे शेळ्या, मेंढ्या, लहान वासरे, रेडकांवर हल्ले करीत आहेत. त्यामुळे आंबी, कुरण खुर्द येथील दीपक निवंगुणे, संजय निवगुणे, अनिल पासलकर, विशाल ठाकर, भगवान निवंगुणे, बाप्पू ढेबे, बबन ढेबे आदी शेतकरी समुहाने जनावरे चारण्यासाठी घेऊन जात आहेत. शनिवारी (दि. 4) आंबी येथील वरपेवाडीच्या रानात बिबट्याने शेतकऱ्यांसमोरच पारडावर हल्ला केला. त्यावेळी गुराख्यांनी बिबट्याला पिटाळून लावले. सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील म्हणाले, सिंहगडसह पश्चिम हवेली भागातील जंगलात बिबट्यांचा अधिवास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी.