पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभाग तसेच संलग्न संशोधन केंद्रातील पीएच.डी. प्रवेशासाठी मुलाखतींची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. संबंधित प्रक्रिया दि. 17 नोव्हेंबर ते दि. 15 डिसेंबरदरम्यान पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी दिले आहेत.
डॉ. रासवे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, पीएच. डी. प्रवेश प्रक्रिया पुढील फेरीकरिता पात्र विद्यार्थी तसेच पीएच. डी. प्रवेश प्रक्रिया 2024-25 मधील पहिल्या फेरीत निवड न झालेले, पेट परीक्षा पात्र व पेट परीक्षेतून सूट मिळालेले पात्र विद्यार्थी यांना रिक्त जागांचा तपशील पाहून संशोधन केंद्र निवडण्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत संधी देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांची यादी व विभागीय संशोधन समितीमधील कुलगुरू नामनिर्देशित दोन प्रतिनिधी (सर्वसाधारण व मागासवर्गीय) यांची नावे महाविद्यालय, विद्यापीठ विभाग यांच्या बीओडी लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यानुसार, सर्व संशोधन केंद्रांनी मुलाखत प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल मुलाखतीनंतर तीन कार्यालयीन दिवसात पीएच. डी. ट्रॅकिंग प्रणालीवर ऑनलाइन पद्धतीने जमा करणे गरजेचे आहे.
सर्व मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांना विभागाच्या, महाविद्यालयाच्या बीओडी लॉगीनमध्ये संबंधित संशोधन केंद्र निवडलेल्या विद्यार्थ्यांची अद्ययावत यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार यादीतील विद्यार्थ्यांना संशोधन केंद्रांनी त्याच्या स्तरावर ई-मेल व दुरध्वनीद्वारे तसेच संशोधन केंद्र महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर मुलाखतीच्या वेळापत्रकाबाबत माहिती प्रसिद्ध करावी. विभागीय संशोधन समितीमधील दोन विषय तज्ज्ञ व अध्यक्षांनी मुलाखतीसाठी एकूण 100 पैकी गुणदान ऑनलाईन पद्धतीने करावे. त्यानंतर मुलाखतीचे गुण पीएच. डी. ट्रॅकिंग प्रणालीवर प्राप्त झाल्यानंतर लागू असल्यास पेट परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण यांचे एकत्रीकरण करून प्रणालीमार्फत गुणवत्ता यादी बीओडी लॉगीनमध्ये उपलब्ध होईल. संशोधन केंद्रांनी निवड केलेल्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता तपासून ते प्रवेशासाठी पूर्ण पात्र असल्याची खात्री करावी, असे देखील डॉ. रासवे यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (स्पुक्टो) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी आज (दि. 17) पासून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. पी. के. वाळुंज आणि सरचिटणीस प्रा. प्रवीण ताटे-देशमुख यांनी दिली आहे.
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये अनेक नवीन विषय सुरू करण्यात आले असून, त्यासाठी विद्यापीठाने नियमित वेतनश्रेणीवर विद्यापीठ निधीतून प्राध्यापकांच्या नेमणुका केलेल्या आहेत. या प्राध्यापकांना सुरुवातीला पाच वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर वीस वर्षे किंवा सेवानिवृत्तीपर्यंत सेवा सातत्य देण्याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया होणे अपेक्षित असताना, प्रशासनाकडून विविध अडथळे निर्माण केले जात आहेत. यामुळे प्राध्यापकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. ईपीएफओऐवजी पूर्वीचाच सीपीएफ लागू करावा, अशी प्रमुख मागणी आहे.