

खडकवासला : सिंहगड किल्ल्यावर रविवारी (दि.16) सुटीच्या दिवशी पर्यटकांनी उच्चांकी गर्दी केली होती. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील वाहतूक सकाळपासून तब्बल दहा वेळा बंद करण्यात आली. किल्ल्यावर वाहनाने आलेल्या पर्यटकांकडून रविवारी दिवसभरात जवळपास सव्वा लाख रुपयांचा टोल वसूल केला.
सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील म्हणाले, रविवारी दिवसभरात पर्यटकांची दुचाकी 1346 व चारचाकी 559 वाहने गेली. गेल्या आठवड्यापासून सिंहगड, पानशेत, राजगड परिसरात थंडी सुरू आहे. मात्र, रविवारी सकाळपासून कडाक्याची थंडी पडली होती. त्यामुळे सकाळी अकरानंतर पर्यटकांची वर्दळ वाढली.
खडकवासला धरण, पानशेत धरण परिसर पर्यटकांनी गजबजून गेला होता. गडकोट, धरण परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. निसर्गाच्या विलोभनीय सौंदर्याचा अप्रतिम नजराणा सूर्याच्या किरणांनी फुलून दिसत होता. रविवारी दिवसभरात सिंहगडावर वीस हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली.
सिंहगड घाट रस्त्यावर सकाळपासूनच वाहनांची वर्दळ सुरू होती. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गडावरील वाहनतळ फुल्ल झाला. घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे घाट रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. गडावरून खाली पर्यटकांची वाहने आल्यानंतर टप्प्या- टप्प्याने वाहने सोडण्यात आली. घाट रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दहा ते पंधरा वेळा वाहतूक बंद करण्यात आली.