वैभव धाडवे पाटील
सारोळा : भोर तालुक्यात आता जिल्हा परिषदेचे पूर्वीप्रमाणे चार गट होणार, तर पंचायत समितीच्या सहाच्या आठ जागा होणार आहेत. या रचनेत राजकीय पदांचा गैरवापर वापर करून बरीच उठाठेव सध्या चालू आहे. कोणाला गट कसा सोयीचा होईल हे पाहिले जात आहे. हा बदल समझोता समजायचा की पक्षवाढीसाठी अथवा स्व-स्वार्थासाठी करीत आहेत याची चर्चा सध्या सुरू आहे.
भोर तालुक्यामध्ये सन 2007 व 2012 च्या निवडणुकीत खानापूर- कारी गटामध्ये वडगाव, उत्रौली ही दोन गावे तर भोलावडे-रायरी गटामध्ये आपटी, नांदगाव, वाठार पिसावरे या चार गावांची विनाकारण अदलाबदल केली जात आहे. घड्याळ्याचे काट्याप्रमाणे गट रचना होत असल्याचे भासवून राजकीय पोळी कोण भाजण्याचा प्रयत्न करतंय. महसूल खात्यावर कोण दबाव आणत आहे हे लवकरच कळणार आहे. घड्याळ्याचे काट्याप्रमाणे सोयीचे राजकारण तालुक्यात पाहावायास मिळत आहे.
खानापूर गणातील वडगाव उत्रौली भाबवडी, खानापूर, हातनोशी, निळकंठ, गोकवडी, बाजारवाडी, नेरे, पळसोशी, बालवडी, पाले वरोडी, वरवडी, आंबाडे, वेणवडी, पोम्बर्डी, शिवलीतर्फे भोर, आंबेघर, पिसावरे, नांटबी, करंजे , कारी गणातील आंबेघर, नांटबी, करंजे, चिखलावडे खुर्द, चिखलावडे (बु.), पान्हवळ, नाझरे, कर्नावड, रावडी, चिखलगाव, टिटेघर, कोर्ले, वडंतुबी, म्हाकोशी, आबंवडे, कारी सांगवी भिडे, साळव, भावेघल, अंगसुळे, आपटी, नांदगाव, वाठार हिमा असा नव्याने खानापूर-कारी गट मतदार संख्या 38,000 आसपास होत असल्याची चर्चा आहे.
सन 2007 व 12 मागील उत्रौली-रायरी गटातील वडगाव, उत्रौलीच्या बदलात खानापूर-कारी गटातील पिसावरे, आपटी, वाठार हिमा, नादगाव या गावांची विनाकारण अदलाबदल करून कोणाला काय साध्य करायचे आहे. गट रचना अदलाबदल करण्यासाठी कोणाची उठाठेव आहे. गट रचना बदलामागे कोणाला कोणाच्या सावलीची भीती आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी काँग्रेस पक्षाकडून माजी जि.प. सदस्य गीताजंली आंबवले, उद्योजक आनंदा आंबवले, माजी पं.स. सदस्य सतीश चव्हाण, उद्योजक अनिल सावले, पांडुरंग धोंडे, अतुल किंद्रे, राष्ट्रवादी पक्षाकडून जि.प. उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष घोरपडे, माजी युवक अध्यक्ष संदीप नांगरे, रोहिदास जेधे, उद्योजक विलास वरे, रवींद्र कोंढाळकर, युवक अध्यक्ष मनोज खोपडे, भाजपमधून भाबवडी सरपंच अमर बुदगुडे, दत्तात्रय नवघणे, अमोल जाधव इच्छुक आहेत.
नुकत्याच तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी पक्षामधून सहा वर्षांकरिता बडतर्फ केलेले माजी सभापती श्रीधर किंद्रे, माजी सभापती दमयंती जाधव, माजी सभापती मंगला बोडके यांची निवडणुकीमध्ये काय भूमिका राहणार यावर ही बरंच काही ठरणार आहे.
भोर तालुक्यातील प्रत्येक गटातील अदलाबदलाची चर्चा मात्र महाविकास आघाडीतील नेते एकत्रित करीत आहेत. घड्याळ्याचे काटे, बाण आणि हाताने फिरवले जात आहेत. नक्की गटातील बदल कशासाठी हा खुलासा नेत्यांनी व महसूल विभागाने करावा, अशी मागणी होत आहे.