मार्चपासून राज्य निर्बंधमुक्‍त, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत | पुढारी

मार्चपासून राज्य निर्बंधमुक्‍त, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

जालना ; पुढारी वृत्तसेवा : येत्या मार्च महिन्यात महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना कोरोना निर्बंधांपासून मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील महिन्यापासून राज्य निर्बंधमुक्‍त करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिले. मास्कमुक्‍तीचा कोणताही विचार नसून, लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे अधिक लक्ष दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाची परिस्थिती पाहता सध्या असलेल्या निर्बंधांत शिथिलता असावी, असे केंद्र सरकार आणि टास्क फोर्सने सुचविले आहे. त्यानुसार येत्या मार्च महिन्यापासून निर्बंधांत शिथिलता आणली जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

निर्बंध कमी करण्याचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला आला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री याबाबत लवकरच निर्णय घेतील. मार्चपासून निर्बंध कमी होण्यास हरकत नाही, असे टोपे म्हणाले. कोरोना स्थितीबाबत केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठविले असून, लसीकरणाकडे अधिक लक्ष देण्यास सुचविले आहे.

तसेच निर्बंधांत शिथिलता आणून मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर याकडे लक्ष देण्यासाठी जागरूकता आणण्यास सांगण्यात आले आहे. या सूचनांकडे आरोग्य खाते लक्ष देत असून, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या मदतीने कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती टोपे यांनी दिली. राज्यात लसीकरण समाधानकारकरीत्या झाले आहे. आता राज्यात फार दिवस निर्बंध राहणार नसून, सध्या काही प्रमाणात निर्बंध असलेले हटवण्यात येतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. गृह विभागाचा अहवाल आल्यानंतर लवकरच आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यात येतील, असे ते म्हणाले.

चौथी लाट येणार नाही

राज्यातील ज्या नागरिकांचे लसीकरण राहिलेले आहे, त्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. समाजाला सुरक्षित ठेवायचे असेल, तर लसीकरण करून घेणे खूप गरजेचे आहे. लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका उद्भवणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

हे निर्बंध उठवणार

* ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय ः 50 टक्के उपस्थितीची अट.
* लग्नसमारंभासाठी 200 व्यक्तींनाच परवानगी.
* स्थानिक प्रशासनाने निर्धारित केलेल्या वेळेनुसार समुद्रकिनारे, उद्याने, पार्क सुरु आहेत.
* उपाहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने.
* भजन आणि इतर स्थानिक सांस्कृतिक आणि लोककला- मनोरंजन कार्यक्रम हे दालन किंवा मंडपाच्या 50% क्षमतेने.
* रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी.
* आठवडी बाजार, पर्यटन स्थळे बंद.
* घोड्यांची शर्यत व इतर खेळांसाठी 25 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती.
* राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी

Back to top button