विजय चव्हाण
केडगाव : पुणे शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेसाठी आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागावी म्हणून दौंडच्या नागरीकरणाच्या जीवनाला अडचण निर्माण केली जातेय. सध्या तिचा आवाका कमी वाटत असला, तरी अल्पवधीत हे उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील शेती उद्ध्वस्त तर होणार असून, मानवी जीवन रोगराईने ग्रासलेले दिसणार, हे निश्चित.
पुणे शहराच्या झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येला पिण्याच्या आणि वापरायच्या पाण्याची सोय ही खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांतून केलेली आहे. त्यातील पाणी त्यांच्या स्वच्छतेची हमी आणि जीवन जगण्याची जिव्हाळ्याची बाब बनली आहे. ही बाब मात्र दौंडच्या नागरिकांच्या भविष्याला मोठी घातक ठरते आहे.
खडकवासला धरणातून पूर्वी पुण्याच्या पाण्याची तहान भागावी, यासह काही पाणी दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील शेतीसिंचनासाठी मिळत होते. त्याच काळात शहरातून येणार्या मुळा-मुठा नद्या खळखळून स्वच्छ पाण्याने वाहत असत. हवेली, दौंड तसेच इंदापूरमधून पुढे पाणी जात असल्याने या तालुक्यातील नदीपट्ट्यातील शेतीसाठी आणि परिसरातील, गावातील नागरिक, जनावरे यांच्या पाण्याची सोय उत्तम होत होती; परिणामी जनजीवन सुरळीत होते. मात्र, वेगात वाढणार्या पुण्याच्या नागरीकरणासमोर खडकवासला धरणातील पाणी तोकडे पडले आणि पाणी प्रश्न लवकरच गहन निर्माण होणार म्हणून टेमघर आणि वरसगाव ही दोन धरणे पुणे शहराच्या डोक्यावर बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला.
धरण बांधले; परंतु ते पुण्याच्या नागरीकरणासाठी मात्र मरण ठरते आहे. दौंडच्या आणि काही प्रमाणात इंदापूरसाठी त्याची चुणूक दिसावयास लागली आहे. मुळा-मुठेतून पुण्याचा वाहणारा मैला आणि बेबी कालव्यातून येणारा पुण्याचा मैला हा आता घातक ठरत आहे.
पुणेकरांची पिण्याची आणि स्वच्छतेची सोया अबाधित राहावी म्हणून जी धरणे बांधण्यात आली, त्या धरण क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. दौंडकरांनी स्वीकारावे म्हणून तुमच्या शेतीला कालव्यातून बारमाही पाणी मिळणार, हे लालूच दाखविले गेले होते आणि तालुक्यातील जमिनींना आरक्षित करीत पुनर्वसन करण्यात आले आहे.
आज तालुक्यात पुनर्वसन करण्यासाठी येथील भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या, त्यांना मोबदला दिला. मात्र, जमीन आणि त्या बदल्यात रकमा, हा न्याय नाही, हे कटू सत्य सर्वश्रुत असतानासुद्धा येथील भूमिपुत्रांच्या माथ्यावर हा आघात केला गेला आहे. याची जखम भरण्याअगोदरच खळखळून वाहणार्या नदीपात्रात पुणेकरांच्या गटारी सोडल्या गेल्या. त्यामुळे आज नदी नव्हे, तर ती गटारगंगा झाली आहे. परिणामी, त्यातील पाणी शेतीला देताना शेतकर्याचे आरोग्य बाधित होते आहे. त्यातून येणार्या उग्र वासामुळे जनावरे तिकडे फिरकत नाहीत. त्यातून निर्माण होणारे डास जनावरांच्या आणि मानवांच्या आरोग्याला हानी पोहचवतात. दुसरीकडे बेबी कालव्यातून येणारे पाणी म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
शहराचे जीवन सुखात, आनंदात सुरू आहे आणि त्यांच्याकडील निघालेले दूषित पाणी दौंडच्या जनतेला काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या प्रवासाकडे घेऊन निघाले आहे. सध्या समाधानासाठी खडकवासला कालव्यातून पाणी मिळत असले, तरी त्याच्या आवर्तनात घट होत आहे. कालांतराने हे पाणी दौंड शहराच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठीच मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बेबी कालव्याचे पाणी दूषित असल्याने त्याचा परिणाम शेती पिकांना होतो आहे. हे पाणी जमिनीत मुरत असल्याने बोअरवेलचे शुद्ध पाणी खराब होत आहे. त्याचा उग्र वास मुंबई खाडीतून निघावा तसा आहे. सध्या हे पाणी केडगावच्या काही अंतरापर्यंत आले असून, येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यात हे पाणी पाटसपर्यंत जाणार आहे. मात्र, पुण्याच्या मुंढवा जॅकवेलमधून पाटसपर्यंतच्या त्याच्या प्रवासाने अनेक जमिनी, बोअरवेल यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे, हे निश्चित.