नसरापूर: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वेल्ह्याकडे जाणार्या चेलाडी ते नसरापूर (ता. भोर) रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. जागोजागी मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.
याशिवाय रस्त्यावर धुरळा उडत आहे. त्याचा वाहनचालकांसह प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा करून देखील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या रस्त्याला कुणी वाली आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. (latest pune news)
चेलाडी फाट्यापासून नसरापूर गावापर्यंत जाणारा मुख्य रस्ता जागोजागी उखडला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास काही महिन्यांपूर्वी खडी आणि क्रश आणून ठेवली होती. मात्र ती देखील गायब झाली आहे.
अद्यापही या रस्त्याचे काम रखडलेलेच आहे. याबाबत नसरापूरच्या सरपंच उषा कदम व ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामे पूर्ण करण्याची विनंती केली. मात्र, अधिकारी ‘आज करतो, उद्या करतो’ अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
पावसाळ्यात रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्याबाबत अधिकारी ग्रामपंचायतीकडे बोट दाखवत आहेत. सध्या रस्त्याचे काम पूर्णपणे बंद असून, रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरून उडणार्या धुरळ्याने व्यावसायिक तसेच स्थानिक त्रासले आहेत.
...अन्यथा आंदोलन अटळ
नसरापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील काळात ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. मात्र, केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. अजूनही अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. दि. 11 मेपूर्वी रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करण्याचे निवेदन मागील आठवड्यात दिले आहे. येत्या 2 दिवसांत दुरुस्ती नाही झाली तर आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी सभापती लहूनाना शेलार यांनी दिला आहे.
खडी उडून एकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत
मागील महिन्यात रस्त्यावरून जाणार्या अवजड वाहनामुळे खडी उडून एकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, तर एका दुकानाच्या काचा फुटल्या. एवढे सगळे झालेले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी एम. मोकाशी आणि प्रशांत गाडे हे लक्ष देण्यास तयार नाहीत, ही गंभीर बाब आहे. दरम्यान, गाडे यांनी लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगितले.
काम सुरू करणार: अधिकार्यांची ग्वाही
ग्रामपंचायतीने या रस्त्याच्या कामासंदर्भात सतत पाठपुरावा केला आहे. आमदार शंकर मांडेकर यांनी बांधकाम विभागाला रस्त्याचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर अधिकार्यांनी लवकरच काम सुरू करणार असल्याची ग्वाही दिल्याची माहिती सरपंच उषा कदम, उपसरपंच नामदेव चव्हाण यांनी दिली.