पुणे : पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए), सीटी एफसी पुणे आणि टॉपप्ले स्पोट्र्स मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पीडीएफए यूथ लीग’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 50 हून अधिक फुटबॉल अकादमी, क्लबचे 180 संघ आणि सुमारे 3 हजार खेळाडू सहभागी झाले, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी व सचिव प्रदीप परदेशी यांनी दिली.
ही स्पर्धा 7, 9, 11, 13, 15 आणि 17 वर्षांखालील अशा एकूण मिळून 6 गटांत होणार आहे. या सर्व वयोगटात मुलांसोबतच प्रत्येक वयोगटातील संघांमध्ये मुलींचासुद्धा सहभाग राहणार आहे. 18 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, सलग पाच महिने या स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेचे सामने प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी होणार आहेत. हे सामने सीटी स्पोर्ट्स अरेना (मोशी), द सिक्स्टी यार्ड टर्फ (मोशी), सिटी स्पोट्र्स अरेना टर्फ (पिंपळे गुरव), एटीके फुटबॉल मैदान रेंजहिल्स-खडकी, हॉटफुट बावधन आणि टॉपप्ले खराडी या मैदानांवर होणार आहे.
स्पर्धेच्या 7 वर्षांखालील गटात 3-अ-साईड, 9 वर्षांखालील गटात 5-अ-साईड, 11 वर्षांखालील गटात 7-अ-साईड, 13 आणि 15 आणि 17 वर्षाखालील गटात पूर्ण 11 खेळाडूंचे सामने होणार आहेत. एआयएफएफच्या ब्ल्यू कब्ज आणि एआयएफएफच्या यूथ लीग या फॉरमॅटनुसार या स्पर्धेची आखणी करण्यात आली आहे.