पुणे: राज्यातील पवित्र संकेतस्थळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार उमेदवारांना पदभरतीसाठी कमाल 50 जागांसाठी प्राधान्यक्रम नोंदविणे, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करणे, उमेदवाराचे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुण केवळ एक वेळच्या शिफारशीसाठी लागू राहतील, अशा बदलांचा समावेश असून, हे बदल अंमलबजावणी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 आणि त्यानंतरच्या चाचणीनुसार केल्या जाणाऱ्या पदभरतीला लागू केले जाणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या रिक्त जागांवरील पदभरती पवित्र संकेतस्थळामार्फत केली जाते. पदभरतीची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शी पद्धतीने काही तरतुदी निश्चित केल्या होत्या. परंतु, या तरतुदींमुळे भरती प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित तरतुदी रद्द करून नव्या तरतुदी निश्चित करण्यात आल्या आहेत.
नव्या तरतुदींनुसार, उमेदवाराचे चालू चाचणीतील गुण मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह, या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एकवेळच्या निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहतील. उमेदवाराला निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. मात्र, उमेदवाराला त्याच्या सोयीनुसार कमाल 50 प्राधान्यक्रम नोंदविता येतील. ही मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्र असेल.
अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल तसेच इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी या गटांसाठी त्या त्या माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग््राजी माध्यमांसह त्या शाळांचे मराठी, उर्दू, कन्नड असे माध्यम विचारात घेऊन उमेदवारांनी दहावीची परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे, त्या माध्यमाच्या शाळेसाठी उमेदवारी विचारात घेण्यात यावी.
पहिली ते पाचवी या गटासाठी सेमी इंग््राजी विषयांसाठी व्यावसायिक अर्हता इंग््राजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या-त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग््राजी माध्यमातून पूर्ण केली नाही; मात्र 12 वी विज्ञान किंवा बीए, एमए इंग््राजी किंवा बीएस्सी, एमएस्सी अशी अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत पदभरती करू इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठीही सुधारित तरतुदी लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.