सोमाटणे : पवना धरण परिसरातील पाटबंधारे विभागाच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. आपटी आणि धामणदरा परिसरातील अतिक्रमणांवर पाटबंधारे विभागाने कारवाईला सुरुवात केली असून, दोन दिवसांत 8 बंगले जमीनदोस्त करण्यात आले आहेत.
सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. या कारवाईसाठी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी माणिक शिंदे, शाखा अभियंता रजनीश बारिया, शीतल पठारे, वैभव देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होता. विशेष म्हणजे, या कारवाई पथकात महिला अधिकाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
या कारवाईदरम्यान पोलिस बंदोबस्ताची गरज होती; परंतु स्थानिक पोलिस प्रशासनाकडून या वेळी कोणताही पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हते. यामुळे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला काहीसा विलंब झाला आहे. पूररेषेखालील सर्व अतिक्रमणे काढण्याचे कार्य सुरू ठेवले जाईल. या अंतर्गत सर्व अतिक्रमणांना हद्दपारीसाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत आणि यापुढे अधिक कडक कारवाई केली जाईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
अतिक्रमण काढण्यासाठी सर्व कायदेशीर उपाय वापरण्यात आले आहेत. यापुढे या परिसरात अशा प्रकारच्या कारवाईसाठी अधिक कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल. अतिक्रमणावर कारवाई सुरू असली तरी, यापुढे कोणत्याही प्रकारच्या गोंधळाचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी एकत्र येऊन काम केले जाइल, असे लोणावळा ग््राामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले.
पाटबंधारे विभागाने पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे बंदोबस्तासाठी मागणी केली होती. त्यानुसार, वरिष्ठ कार्यालयाकडून अहवाल मागविला होता. तो मिळाला असून, कार्यालयाकडून सूचना आल्यानंतर कारवाई वेळी पुरवले जाईल, असे पोलिस प्रशासनाने सांगितले.