पौडला शेतकर्‍याचे तेराव्या दिवशीही उपोषण सुरूच; चुकीची मोजणी झाल्याचा आरोप  Pudhari
पुणे

Pune: पौडला शेतकर्‍याचे तेराव्या दिवशीही उपोषण सुरूच; चुकीची मोजणी झाल्याचा आरोप

गेली 13 दिवसांपासून उपोषण सुरू

पुढारी वृत्तसेवा

पौड: मोजणी कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चुकीच्या मोजणीचा फटका बसलेल्या लवळे (ता. मुळशी) येथील शेतकरी अरुण भिकोबा राऊत या शेतकर्‍याने भूमिअभिलेख कार्यालयाविरोधात न्यायासाठी सहकुटुंब येथील तहसीलदार कार्यालयासमोर गेली 13 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.

उपोषणात त्यांच्यासमवेत आई सिंधूबाई, आत्या कमल बाळसराफ, पत्नी मीना, मुलगी रूपाली कुदळे, जावई संदीप कुदळे, मुलगा तुषार, सून वृषाली, नातू सौम्या, धनुष्या, वैष्णव, चुलतभाऊ सोमनाथ, दत्तात्रेय, मंदा सातव आदी तेरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अरुण राऊत यांनी अन्न आणि औषधांचा त्याग केला असून, प्रकृती चिंताजनक झाली आहे. (Latest Pune News)

लवळे येथील शेतजमिनीची काही वर्षांपूर्वी मोजणी झाली होती. त्या वेळी भूमिअभिलेख कार्यालयाने शेतीचा गटाच्या हद्दीवर शेतकर्‍याचे घर दाखविले. परंतु, हे घर तेथे नसून तेथून काही अंतरावर आहे, असे राऊत यांचे म्हणणे आहे.

मोजणी अधिकार्‍यांनी हद्दीच्या चुकीच्या खुणा दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे केलेली मोजणी न्यायालयात दाखवल्याने त्यांच्याविरुद्ध निकाल लागला. सरकारी नकाशात या जागांच्या हद्दी अगदी सरळ दाखविल्या गेल्या आहेत. मात्र, मोजणी अधिकारी यांनी मनमानीपणे बदल केल्याचा राऊत यांचा आरोप आहे.

पूर्वीपासून जो नकाशा आणि हद्द अस्तित्वात आहे त्याप्रमाणे मोजणी करावी अशी त्यांची मागणी आहे. भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षक प्रभाकर मुसळे यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन राऊत यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. या बाबीची तपासणी करून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

एकाच जागेची चार वेळा मोजणी करून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रती देण्यात आल्या. यामुळे मोजणी विभागाच्या अधिकार्‍यांना कुणाचे भाय राहिले नाही, असे पौडचे माजी सरपंच विनायक गुजर व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बलकवडेयांनी सांगितले.

अरुण राऊत यांच्या शेताची मोजणी यापूर्वी झाली आहे. ती मान्य नसल्याने सदरच्या जागेची केस भूमिअभिलेख, भोर यांच्याकडे वर्ग केली आहे. त्यांनी मोजणी केली आहे. त्यांच्याकडील प्रकरण आम्हाला मुळशी अभिलेख कार्यालयास प्राप्त झाले की वरिष्ठ अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून योग्य निर्णय घेतील.
- स्वप्ना पाटील, उपअधीक्षक भूमिअभिलेख मुळशी, पौड
निरपेक्ष मोजणी भूमिअभिलेखने करावी. पेपरप्रमाणे काम करा अन्यथा हा पेपर चुकीचा आहे असे लेखी पत्राद्वारे कळवावे.
- अरुण राऊत, उपोषणकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT