Pataleshwar Caves Pudhari
पुणे

Pataleshwar Caves: पाताळेश्वर लेणीतील नंदी मंडपाची दुरुस्ती; 60 लाखांचा निधी मंजूर

जर्जर छत आणि खांबांची शास्त्रीय डागडुजी; चालू वर्षात काम पूर्ण होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पाताळेश्वर लेणीसमोरचा भव्य नंदी मंडप जर्जर झाला आहे. मोठ्या पाठपुराव्यानंतर अखेर त्याची दुरुस्ती होणार असून, मोडकळीस आलेले छत, चिरा पडलेले दगडी खांब याची शास्त्रीय पद्धतीने डागडुजी होणार आहे. त्यासाठी 60 लाख रुपये खर्च मंजूर झाला आहे. अभियांत्रिकी गणित करून छताचा भार अभ्यासण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात हे काम पूर्ण होणार आहे.

केंद्रीय पुरातत्व विभागाचे राज्यात तीन विभाग आहेत. यात पुणे हे मुंबई विभागात येते. पाताळेश्वर लेणी ही मुंबईच्या अख्त्यारित येते. या लेणीविषयी स्पष्ट शिलालेख किंवा ऐतिहासिक पुरावे नसले, तरी ही लेणी राष्ट्रकुट राजवंशाच्या काळात तयार केली असावी, असे इतिहासकार सांगतात. लेणीतील महादेव मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात भव्य नंदी मंडप असून, तोच या मंदिराचे आकर्षण आहे. एकूण 16 खांबांवर भव्य छत असून, गोलाकार पद्धतीने हा नंदी मंडप तयार केला आहे. इसवि 750 (8 वे शतक) मध्ये ही लेणी कोरली गेली असावी, असा अंदाज आहे.

नंदी मंडपाची मोजमापे...

  • घटक मोजमाप (अंदाजे)

  • मंडपाचा व्यास 9 ते 10 मीटर

  • मंडपाची उंची 4 ते 5 मीटर

  • नंदी मूर्तीची लांबी 1.5 ते 2 मीटर

  • नंदी मूर्तीची उंची 1 ते 1.2 मीटर

वैशिष्ट्ये काय?

  • दगडाचा प्रकार : बेसाल्ट (ज्वालामुखीय खडक)

  • शैली: राष्ट्रकुटकालीन शैलीकला

  • मंडपाची गोलाकार रचना ध्वनी, प्रतिध्वनी (इको) निर्माण करते

छताचा 16 खांबांवर पडणारा भार कमी कसा करता येईल, याचा अभियांत्रिकी पद्धतीने अभ्यास करीत आहोत. प्रथम हा मंडप स्वच्छ करून मग त्याच्या डागडुजीचे काम केले जाणार आहे. एकूण 60 लाख रुपये खर्च अपेक्षित असून, त्याला मंजुरी मिळाल्याने हे काम चालू आर्थिक वर्षात पूर्ण केले जाणार आहे.
गजानन मंडावरे, वरिष्ठ संरक्षण अधिकारी, पाताळेश्वर लेणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT