पुणे: पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली पाताळेश्वर लेणी हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शिवाजीनगर येथील जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या या लेणीतील शिवशंकराचे मंदिर हे भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक श्रावणी सोमवारला येथे गर्दी करतात. पाताळेश्वर लेणीबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
पाताळेश्वर लेणी शिवाजीनगर भागात आहे. हे शिवालय राष्ट्रकुट राजवटीच्या काळातले आहे. इ. स. 8 व्या शतकाच्या सुमारास एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केलेली लेणी म्हणून पाताळेश्वर लेण्यांची नोंद आहे. कातळाच्या भव्य चौकोनी स्तंभांनी पेललेला गोलाकारातील मंडप या वास्तूच्या सुंदरतेचे आणि त्या काळातील वास्तूकलेचे दर्शन घडवितो. लेण्यात प्रवेश केल्यानंतर समोर तीन गर्भगृहे दिसून येतात. (Latest Pune News)
बाहेर नंदी आहे. मधल्या गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग, बाजूच्या गर्भगृहात श्रीगणपती आणि तिसर्या गर्भगृहात पार्वतीची मूर्ती आहे. शिवलिंगाच्या या गर्भगृहाच्या दरवाजानजीक आकर्षक नक्षीकाम आहे. येथील भिंतींवर शिल्पे आहेत. तर प्रदक्षिणा मार्गात श्रीराम-लक्ष्मण-सीता आणि समोर मारुतीची मूर्ती आहे.
प्रदक्षिणा करून पुन्हा समोर येईपर्यंत लेण्यांची भव्यता नजरेस भरते. पाताळेश्वर लेणी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात पाताळेश्वर लेणी असून, येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
येथे अनेक धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. येथील लेणी पाहिल्यानंतर प्रत्येकाला एक वेगळीच अनुभूती येते. प्रत्येक भाविकासाठी हे श्रद्धास्थान आहे. श्रावणी सोमवारलाही येथील शिवमंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.